इंदापुरातील गरजूंसाठी मदतीचे हात 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

इंदापूर तालुक्‍यातील मच्छ व्यावसायिक आणि ऊसतोड कामगार कुटुंबीयांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

 इंदापूर : तालुक्‍यातील पडस्थळ येथील 39 मच्छ व्यावसायिक आणि पिंपरी खुर्द येथील 25 ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 960 रुपयांच्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.  

पुणे येथील सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अँड ऍक्‍टिव्हिटीज (सीवायडीए) व विप्रो कंपनीच्या पुढाकाराने आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके मित्र परिवार, नेहरू युवा केंद्र व आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या सहकार्याने उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील भीमा नदीकाठी या वस्तूंचे वाटप पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.  

"सीवायडीए'चे संचालक प्रवीण जाधव, दत्तात्रेय व्यवहारे, विष्णू व्यवहारे, संजय व्यवहारे, पडस्थळचे पोलिस पाटील गणेश राऊत यांच्या हस्ते प्रत्येकास प्रत्येकी 5 किलो तांदूळ, आटा, साखर 5 किलो, खाद्य तेल 1 लिटर, तूरडाळ व शेंगदाणे 1 किलो, मीठ पाकीट, चहापत्ती, लाल मसाला, धने, जिरे, हळद सर्व 100 ग्रॅम, 100 ग्रॅम पेस्ट, प्रत्येकी 2 अंगाचे व कपड्याचे साबण यांचे वाटप करण्यात आले. त्यांना 15 दिवसाचे अत्यावश्‍यक सामान मिळाल्याने दिलासा मिळाला.  

यासंदर्भात संचालक प्रवीण जाधव म्हणाले, ""तालुक्‍याचे भूमिपुत्र म्हणून कर्तव्य भावनेने आपण ही मदत वंचितांना केली आहे.''  महेंद्र रेडके म्हणाले, ""माझे गाव व पंचक्रोशीत कोणीही उपाशी राहू नये, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping hands for the needy in Indapur