

(टीप- सकाळ मनी मे २६)
(हा लेख दोन पानांत बसवावा. लेफ्ट अलाइन्ड आणि इटॅलिक)
----------------------------
सेक्शन
म्युच्युअल फंड
--------------
म्युच्युअल फंडातील
पडद्यामागील ‘कलाकार’
---------------------
डॉ. वीरेंद्र ताटके
tatakevv@yahoo.com
-------------------------
लीड
----
आज भारतातील म्युच्युअल फंड उद्योग झपाट्याने वाढत असून, त्याची एकूण मालमत्ता लाखो कोटींच्या घरात पोहोचली आहे. मात्र, या प्रचंड व्यवस्थापनामागे नेमकं कोण काम करतं, गुंतवणूकदारांच्या पैशांची सुरक्षितता कशी राखली जाते आणि पडद्यामागील कोणते ‘कलाकार’ या व्यवस्थेला चालना देतात, हे अनेकांना माहीत नसते. या संपूर्ण यंत्रणेची ओळख करून देणारा हा गुरु-शिष्यातील संवाद...
-----------------------------------------
अनिकेत : नमस्कार सर...
शिक्षक : अरे, ये अनिकेत! आज काय विशेष मोहीम?
अनिकेत : सर, थोडा वेळ असेल, तर एका विषयाची माहिती घ्यायची होती तुमच्याकडून.
शिक्षक : (हसत) अरे, तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. बोल, कोणत्या विषयावर गप्पा मारायच्या आहेत?
अनिकेत : सर, मला थोडी भीती वाटते आहे. त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. मी नुकतंच असं वाचलं, की आपल्या देशाच्या म्युच्युअल फंड व्यवसायाची एकूण मालमत्ता ८२ लाख कोटी रुपये एवढी प्रचंड आहे.
शिक्षक : (हसत) बरोबर वाचलंस तू ! पण त्यात भीती वाटण्यासारखं काय आहे?
अनिकेत : पण सर, विश्वास बसत नाही की एवढी प्रचंड रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जात असेल आणि खरं सांगतो सर, थोडी भीतीसुद्धा वाटली.
शिक्षक : तेच विचारतो आहे मी, भीती कशाची वाटली?
अनिकेत : सर, माझ्या गुंतवणुकीचा मोठा भाग म्युच्युअल फंडात आहे. या एवढ्या मोठ्या रकमेमध्ये माझ्यासारख्या छोट्या गुंतवणूकदाराची गुंतवणूक कुठे हरवून तर जाणार नाही ना! मी असं ऐकलं होतं, की फंड मॅनेजर नावाची व्यक्ती हे सर्व व्यवहार बघत असते.
शिक्षक : याचा अर्थ तुला म्युच्युअल फंड व्यवसायाची व्याप्तीच माहिती नाही, असं दिसतंय. अरे, आपल्याला आपल्या गुंतवणुकीचे मूल्य फक्त ‘एनएव्ही’च्या स्वरूपात दिसत असले तरी त्यामागे मोठी टीम काम करत असते. तुला ऐकायचं आहे का, या टीममध्ये कोणकोण असतात आणि त्यांची कामे काय असतात?
अनिकेत : हो सर! प्लीज सांगा. त्यामुळे माझ्या मनातील शंका तरी दूर होतील.
शिक्षक : म्युच्युअल फंड कंपनी म्हणजे एक व्यवस्थित समन्वयाने चालणारी संस्था आहे. प्रत्येक विभागाचं वेगळं काम असतं; पण सगळ्यांचा उद्देश एकच- गुंतवणूकदारांना चांगला परतावा आणि सुरक्षितता देणे. या टीमचा केंद्रबिंदू असतो फंड मॅनेजर! फंड मॅनेजर हा संपूर्ण फंडचा कॅप्टन असतो. तो कोणत्या शेअरमध्ये, बाँडमध्ये किंवा इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये कधी आणि किती गुंतवणूक करायची हे ठरवतो. तो अर्थव्यवस्था, मार्केट ट्रेंड, व्याजदर, उद्योग क्षेत्र यांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेतो.
अनिकेत : म्हणजे त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असते ना सर! आणि मला नेमकी त्याचीच तर भीती वाटते. या एका व्यक्तीच्या निर्णयावर आपली सर्व गुंतवणूक अवलंबून असते. त्याचे निर्णय योग्य असतील, तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो, नाहीतर नुकसानही होऊ शकतं.
शिक्षक : अरे थांब, थांब! फंड मॅनेजर हा टीमचा कॅप्टन असतो आणि तो एकटा सगळे निर्णय घेतो असं वरवर पाहता दिसत असलं, तरी त्याच्या सोबतीला मोठी टीम असते. फंड मॅनेजरसोबत मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) असतात, जे म्युच्युअल फंडाच्या संपूर्ण गुंतवणूक धोरणाचे नियोजन करतात आणि फंड मॅनेजरना मार्गदर्शन करतात. आता इतर प्रत्येकाविषयी माहिती ऐक. त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे रिसर्च ॲनालिस्ट! ही व्यक्ती म्हणजे म्युच्युअल फंडाला आवश्यक असलेल्या माहितीचा आधारस्तंभच. वेगवेगळ्या कंपन्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटचा अभ्यास करणे, त्याचबरोबर प्रत्येक इंडस्ट्रीचा अभ्यास करणे, त्यातील वेगवेगळ्या कंपन्यांचा तुलनात्मक अभ्यास करून चांगल्या कंपन्या शोधून काढणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भविष्याचा वेध घेऊन फंड मॅनेजरला सल्ला देणे हे काम रिसर्च ॲनालिस्ट करतात. थोडक्यात, ‘Buy’, ‘Hold’ किंवा ‘Sell’ अशा शिफारसी ते करतात. अर्थात, अंतिम निर्णय फंड मॅनेजर घेतो.
अनिकेत : ओह! पण फंडाच्या गुंतवणुकीचे संतुलन राखणारा कोणी असतो का?
शिक्षक : असतो ना! त्याला पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणतात. त्याची भूमिका आणि रिसर्च ॲनालिस्टची भूमिका वरवर पाहता एकसारखी वाटत असली, तरी पोर्टफोलिओ मॅनेजरचे मुख्य काम म्हणजे गुंतवणुकीचं योग्य मिश्रण तयार करणे, जेणेकरून एकूण गुंतवणुकीतील जोखीम-लाभ गुणोत्तर आकर्षक राहील.
अनिकेत : फारच छान! पण एखाद्या फंडातील गुंतवणुकीची जोखीम मर्यादेपलीकडे जाऊ नये यासाठी कोणी काम करत असतो का?
शिक्षक : असतो ना! त्याला रिस्क मॅनेजर, अर्थात ‘सुरक्षिततेचा रक्षक’ म्हणतात. तो वेगवेगळ्या जोखमींचा अभ्यास करतो. जसं की एकूण अर्थव्यवस्थेतील जोखीम किती आहे, एखाद्या कंपनीतील जोखीम किती आहे; तसेच आपत्तीच्या वेळी गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे काढून घेण्याचे ठरवले तर फंडाकडे पुरेसे पैसे शिल्लक असावेत याचीदेखील तो खातरजमा करतो. एखादी विपरीत घटना घडल्यास फंडाचे किती नुकसान होऊ शकते याचाही अभ्यास तो वेगवेगळ्या सांख्यिकी मॉडेलच्या मदतीने करतो.
अनिकेत : सर, खरं सांगतो, म्युच्युअल फंडातील माझ्या गुंतवणुकीची काळजी घेण्यासाठी एवढे लोक काम करत असतील याची मला कल्पनाच नव्हती...
शिक्षक : अजून ऐक. या टीममध्ये एक कम्प्लायन्स ऑफिसरदेखील असतो. ‘सेबी’नं आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन म्युच्युअल फंडाकडून होत आहे की नाही याची तपासणी तो करत असतो.
अनिकेत : पण याचा गुंतवणूकदाराला काय उपयोग?
शिक्षक : सांगतो. एखाद्या म्युच्युअल फंडावरील विश्वास दृढ होण्यासाठी त्या फंडाच्या माहितीत पारदर्शकता असणे अत्यावश्यक असते. ‘सेबी’ त्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करत असते. त्यामुळे ‘सेबी’च्या नियमांचे पालन केल्याने गुंतवणूकदारांना अप्रत्यक्षपणे फायदाच होतो.
अनिकेत : आलं लक्षात! सर, मी गुंतवणूक करत असलेल्या फंडाची ‘एनएव्ही’ मला रोज कळते. त्यासाठी कोणीतरी काम करत असेल ना?
शिक्षक : असतं ना! त्यासाठी ऑपरेशन टीम काम करत असते. दररोज म्युच्युअल फंडात जे लाखो व्यवहार होतात त्याचे रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी या टीमकडे असते. शिवाय कामकाजाच्या प्रत्येक दिवसाच्या शेवटी नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) कॅल्क्युलेट करून गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीसुद्धा या टीमकडे असते. शिवाय म्युच्युअल फंडाच्या विविध योजना गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवणारी सेल्स आणि मार्केटिंग टीमसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. विविध प्रकारच्या जाहिराती, डिजिटल मार्केटिंग, जनजागृती अभियान या माध्यमातून ते गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचतात आणि नवे गुंतवणूकदारसुद्धा जोडतात.
अनिकेत : बरोबर आहे सर!
शिक्षक : याबरोबरच म्युच्युअल फंड सल्लागार, वितरकसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत, कारण प्रत्यक्षात गुंतवणूकदारांपर्यंत तेच लोक पोहोचत असतात. याचबरोबर कस्टमर सर्व्हिस टीमला विसरून चालणार नाही, कारण गुंतवणूकदारांच्या अडचणी, समस्या तेच सोडवत असतात. तसंच अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी दैनंदिन ग्राहकसेवा, माहितीसाठा आणि व्यवहारांची पूर्तता करण्याच्या कामासाठी क्वॉलिफाइड रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट (क्यूआरटीए) म्हणून ‘कॅम्स’ किंवा ‘के-फिनटेक’ यासारख्या कंपन्यांची नियुक्ती केलेली असते.
अनिकेत : (हसत) हो सर! मी तर या लोकांना माझ्या वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी फोन करून सारखा त्रास देत असतो.
शिक्षक : याशिवाय सर्व हिशोब ठेवणारी अकाउंट आणि फायनान्स टीम, सर्व कागदपत्रांचे ऑडिट करणारी ऑडिट टीम, त्यांना सपोर्ट देणारी आयटी टीम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या पसाऱ्याचा सांभाळ करणारी एचआर आणि ॲडमिन टीम! हे सर्व लोकसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत!
अनिकेत : अरे बापरे! माझ्यासारख्या सर्वसामान्य म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एवढे सर्व लोक काम करत असतात, हे मला अजिबात माहीत नव्हतं. खऱ्या अर्थाने हे सर्व लोक पडद्यामागचे कलाकार आहेत.
शिक्षक : अगदी बरोबर बोललास! शिवाय या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सेबी’ ही संस्था देखील कार्यरत आहे. कोणत्याही परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदाराच्या हिताचे संरक्षण करणे हा ‘सेबी’चा उद्देश असतो. आता मला सांग, की तुझ्या मनात जी भीती होती ती कमी झाली का?
अनिकेत : (हसत) कमी नाही झाली सर, पूर्णपणे गेली...!
(लेखक आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत. मोबाईल ९२२५५११६७४)
----------------------पूर्ण-----------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.