टोपीखाली दडलयं काय?

टोपीखाली दडलयं काय?
Published on

उन्हाळा विशेष
टोपीखाली दडलंय काय...?
- स्नेहल बाकरे
--------------------------------------
लीड
काळानुसार टोपी स्टाइल स्टेटमेंट होत चालली आहे. टोपीचं महत्त्व वेषभूषेपुरतंच मर्यादित राहिलेलं नसून, लोकांच्या स्वभावाचं, वृत्तीचं आणि परिस्थितीचं वर्णन करण्यासाठीही ती सहजपणे वापरली जाते. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापरली जाणारी टोपी त्या क्षेत्राची ओळख, जबाबदारी आणि परंपरा व्यक्त करते.
--------------------------------------

उन्हाळा सुरू झाला, की जागोजागी जशी उसाच्या रसाची गुऱ्हाळं, आइस्क्रीमची दुकानं दिसतात, तशीच विविध रंगांच्या व आकारांच्या टोप्यांची दुकानंही सजलेली दिसतात. सुट्टी आणि वैशाख वणवा यांचं अजबच गणित आहे. रखरखत्या उन्हात जिवाची काहिली होत असतानाही मुलांना खेळायचा भारीच सोस! मग अशावेळी ही टोपी मात्र आईला आपल्या मुलांच्याबाबतीत एखाद्या ढालीसारखीच भासते. खास करून उन्हाळ्यात सगळ्यांचाच टोपीबद्दलचा स्नेह जरा जास्तच वाढू लागतो.

या टोपीखाली दडलंय काय?
सुरुवातीला लोक ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून आपल्या डोक्याचं संरक्षण करण्याकरता झाडाची पानं, जनावरांची कातडी किंवा कापडाचा वापर करत. कदाचित हळूहळू याचंच रूपांतर टोपीत होत गेलं असावं. टोपीचा शोध कोणी व कधी लावला याबद्दल नेमकं असं काही सांगता येणार नाही. पण कांस्ययुगात इ. स. पूर्व १४०० ते ८००च्या दरम्यान युरोपातल्या काही पुरातत्त्वांमध्ये सोन्याच्या पातळ पत्र्यापासून तयार केलेल्या लांब, उंच व निमुळत्या शंकूच्या आकाराच्या टोप्या आढळल्या होत्या. प्राचीन इजिप्तमधल्या काही भित्तीचित्रांतही शंकूसारख्या टोपीचे पुरावे आढळले आहेत. ग्रीस आणि रोममध्ये ‘पिलियस’ आणि ‘पेटासोस’ यांसारख्या टोप्या सामाजिक स्तराचं प्रतीक मानल्या जात. गुलामाला मुक्त करताना त्याचं मुंडन करून त्याच्या डोक्यावर टोपी चढवली जायची, असे संदर्भही काही कथांमध्ये आढळून येतात.

रोमन लोकांमध्ये लोकरीची टोपी स्वातंत्र्याचं प्रतीक होतं. युरोपमध्ये टोपी हा शिष्टाचाराचा भाग होता. स्वीडनसारख्या इतर पाश्चात्य देशांमध्ये चर्चमध्ये प्रवेश करताना पुरुषांनी आपली टोपी काढणं ही प्रथा आजही अस्तित्वात आहे. पहिल्या महायुद्धापर्यंत महिलांनी डोक्यावर पांढरी टोपी घालणं हाही प्रथेचा भाग होता. सार्वजनिक ठिकाणी महिला आवर्जून टोपी परिधान करत. लंडनमध्ये टोपीला खूप जास्त सामाजिक महत्त्व होतं. १७ व्या व १८व्या शतकात पुरुषांसाठी ट्रायकोन, टॉप हॅट, पिसांनी सजवलेली कॅव्हेलिअर हॅट, बॉलर हॅट अशा ठरावीक प्रकारच्या हॅट्स होत्या. तर महिलांसाठी बोनेट हॅट, रिबिन, फुल व लेस यांनी सजवलेल्या मोठ्या काठ असलेल्या हॅट्स, राजदरबारातील फॅशनचं प्रतीक असणाऱ्या फॉन्टाज हेअरड्रेस फारच लोकप्रिय होतं. रॉयल इव्हेंट्स किंवा लग्नसमारंभ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये आजही महिलांनी वेगवेगळ्या स्टाइलची टोपी परिधान करणं तिथली परंपरा आहे.

मिलिनरी म्हणजे टोपी किंवा हेडगिअर्स तयार करण्याची कला. साधारण १७व्या व १८व्या शतकात इटलीतील मिलान हे शहर उत्तम दर्जाच्या हॅट्स तयार करण्यासाठी प्रसिद्ध होतं. त्यामुळे इटलीला ‘टोप्यांचं शहर’ असंही म्हटलं जायचं. रशियातील कडाक्याच्या थंडीपासून बचाव करणारी फरपासून तयार केली जाणारी ‘उशांका’ टोपी रशियन सैन्याची किंबहुना रशियाची ओळख मानली जाते. मेक्सिकन भाषेत ‘सोम्ब्रा’ या शब्दाचा अर्थ सावली असा होतो. तेथील ‘सोम्ब्रेरो’ ही टोपी राष्ट्रीय अभिमान म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये घातली जाते.

भारतातही प्राचीन काळात राजे-महाराजे डोक्यावर शिरस्त्राण म्हणजेच टोपी म्हणजेच मुकुट घालत असत. ते सत्तेचं प्रतीक मानलं जात. छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शिरपेच’ (कलगी असणारी पगडी) हा टोपीचा प्रकार आजही मराठा परंपरेचा अभिमान मानला जातो. शीख परंपरेतील महाराजा रणजितसिंग यांची पगडी ‘दस्तार’ ही केवळ राज्य व सत्तेचीच नव्हे, तर धार्मिकतेचीही ओळख होती. आजही शीख समुदायांमध्ये पगडीला / साफाला पवित्र स्थान आहे.

तिरछी टोपीवाले
नेपोलियन बोनापार्ट याची दोन टोकांना झुकलेली ‘बायकॉर्न हॅट’ ही त्याची खास ओळख होती. अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांच्यामुळे इक्वेडोरमध्ये तयार केल्या जाणाऱ्या ‘पनामा हॅट’च्या लोकप्रियतेत भर पडली. तसेच अब्राहम लिंकन यांची उंच ‘टॉप हॅट’ इतकी प्रसिद्ध होती, की ती त्यांच्या प्रतिमेचाच एक भाग झाली.

युरोपमध्ये विस्टन चर्चिल यांची होमबर्ग हॅट त्यांच्या नेतृत्वाइतकीच दिमाखदार होती. प्रिन्सेस डायनाच्या एलिगंट व स्टायलिश ‘फॅसिनेटर हॅट्स’ या तिच्याइतक्याच चर्चेत असायच्या. फ्रान्समध्ये रेम्ब्रॅंड या डच कलाकारामुळे ‘बॅरेट हॅट’ ही कलाकार आणि बुद्धिजीवी लोकांची ओळख झाली. तुर्कस्तानमध्ये एक आगळावेगळा टोपी कायदा होता. मुस्ताफा केमाल पाशा याने पारंपरिक ‘फेज’ऐवजी पाश्चिमात्य हॅट्सला प्रोत्साहन देत आधुनिकतेचा संदेश दिला. चीनमध्ये माओ झेडाँग यांची ‘माओ कॅप’ ही संपूर्ण कम्युनिस्ट चळवळीचं प्रतीक होती.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सत्य आणि देशभक्तीचं प्रतीक असणाऱ्या ‘गांधी टोपी’ला आजही एक विशेष महत्त्व आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू वापरत असलेली टोपी आजही ‘नेहरू टोपी’ म्हणून प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळकांची ‘लाल पगडी’ त्यांची खास ओळख तर होतीच, शिवाय ती त्यांच्या आक्रमक व ठाम स्वभावाचं प्रतीकही मानली जात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) काळी टोपी शिस्त, एकसंधता आणि संघटनेची ओळख दर्शवते.

काळानुसार टोपी स्टाइल स्टेटमेंट होत चालली आहे. कॅज्युअल, स्पोर्टी किंवा क्लासी लुकला हटके टच देण्यासाठी जगभरात टोपी किंवा हॅटसारख्या हेडगिअरचा आवर्जून वापर केला जातो. चार्ली चॅप्लिनची छोटी बॉलर हॅट म्हणजे त्याची सिग्नेचर स्टाइलच म्हणावी लागेल. तसेच मायकल जॅक्सनची फेडोरा हॅट त्याच्या डान्स मुव्हजइतकीच प्रसिद्ध होती. राज कपूरची श्री ४२०मधली ‘डर्बी हॅट’ आजही आयकॉनिक मानली जाते.

बीटीएस या के-पॉप स्टारबॅंडमुळे बेनिज हॅट्सचा ट्रेंड जगभरात पसरला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो किंवा विराट कोहलीच्या कॅज्युअल कॅप लुकची तरुणांमध्ये क्रेझ आहे. कार्टून आणि ॲनिमिटेड कॅरेक्टर्समुळंही काही विशिष्ट टोप्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मारिओची ‘एम’ टोपी आणि पोकेमॉनमधल्या ॲशच्या वेगवेगळ्या लोगो असणाऱ्या टोप्यांचं लहान मुलांमध्ये आकर्षण आहे.

टोपी अशीही... तशीही...
सध्या टोपी आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापरली जाणारी टोपी केवळ पोशाखाचा भाग नसून, त्या क्षेत्राची ओळख, जबाबदारी आणि परंपरा व्यक्त करते. ब्रिटिश परंपरेतून आलेली न्यायाधीशांची विशिष्ट केसांच्या विगप्रमाणे रचना असलेली टोपी न्यायालयातील गंभीरता आणि निष्पक्षता दर्शवते. हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रातली शेफची उंच व पांढरी टोपी त्या शेफचा अनुभव आणि दर्जाचं प्रतीक असते. जितकी उंच टोपी, तितका मोठा अनुभव अशी एक पारंपारिक समजूतही आहे. शिक्षण क्षेत्रात पदवीदान समारंभात वापरली जाणारी चौकोनी टोपी ‘मॉर्टारबोर्ड’ त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक यश व मेहनतीचं प्रतीक आहे.

आता टोपीचं महत्त्व फक्त वेषभूषेपुरतंच मर्यादित राहिलेलं नसून, लोकांच्या स्वभावाचं, वृत्तीचं आणि परिस्थितीचं वर्णन करण्यासाठीही ती सहजपणे वापरली जाते. जसे, काही महारथी इतरांना टोपी घालण्यात फारच माहीर असतात. काहींसाठी टोपी फिरवणं हा ‘बाये हाथ का खेल’ असतो. काही चालाख माणसांना परिस्थितीनुसार अगदी सहजपणे टोपी बदलता येते, तर काहीजण आपल्या पगडीची म्हणजेच घराण्याची शान राखण्यासाठी ठामपणे उभे असतात. एखाद्याचा सन्मान करायचा असेल, तर फेटा बांधण्याची परंपरा आजही जिवंत आहे. सन्मानपूर्वक नकार द्यायचा असेल, तर आपल्याकडे पगडी परत करण्याचीदेखील रीत आहे. एकंदरीत पगडी उडवणं आणि म्हणजे अपमान आणि फेटा उंचावणं म्हणजे अभिमान हे नकळतपणे आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेलं आहे. म्हणूनच टोपी, फेटा किंवा पगडी हे केवळ डोक्यावरची वस्त्रं नसून, ती आपल्या मानसन्मानाची, अस्तित्वाची आणि जीवनशैलीची जिवंत खूण आहे.

---

(स्नेहल बाकरे या पुणेस्थित लेखिका, कवयित्री व पटकथा लेखिका आहेत.)
---------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com