कांदा उत्पादकांना अच्छे दिन; मंचरला मिळाला 120 रुपये प्रति किलो बाजारभाव

डी. के. वळसे-पाटील
Tuesday, 20 October 2020

गोळा कांद्याला प्रति किलोला 120 रुपये उच्चांकी बाजारभाव मिळाला.

मंचर : अडगळीत पडलेल्या कांद्याचा रुबाब आता चांगलाच वाढला आहे. कांदा उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 20) रोजी गोळा कांद्याला प्रति किलोला 120 रुपये उच्चांकी बाजारभाव मिळाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, लिलाव पद्धतीने बिट सुरू असताना अनेक शेतकरी अडते यांच्यामध्ये बाजारभावाची सुरु असलेली बोली व मिनिटा मिनिटाला वाढत चाललेली चढाओढ पाहत होते. चांडोली बुद्रुक येथील शेतकरी बाळशीराम मारुती थोरात यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. आठ कांदा पिशव्यांना ५५ हजार ६८० रुपये रक्कम मिळाली. त्यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी टाळ्या वाजवून मिळालेल्या बाजार भावाचे स्वागत केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

"कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सहा हजार कांदा पिशव्यांची आवक झाली" अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
ते म्हणाले"  मंचर बाजार समिती आवारात रविवार, मंगळवार व गुरुवारी शेतकऱ्यांच्या समक्ष लिलाव पद्धतीने कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. पुणे-मुंबई भागातून कांदा खरेदीसाठी व्यापारी आले होते. येथील वीस अडते ही कांदा खरेदीच्या व्यवहारात सहभागी झाले होते. कांद्याचे बाजारभाव वाढत असल्यामुळे यापूर्वी अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अडते बाबुशा मोरडे व सागर थोरात म्हणाले, ''अन्य राज्यातून येणारी कांद्याची आवक कमी झाली आहे. त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. आपल्या परिसरातही कांदा उत्पादन घटले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी सुरू झाल्यामुळे कांद्याला मागणी वाढली आहे. पिंपळगाव, निरगुडसर, कळंब, लाखनगाव काठापूर, भागडी, पिंपरखेड, कवठे या भागातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. 110 रुपये प्रतिकिलो बाजार भाव टाव्हरेवाडी येथील शेतकरी बाळासाहेब टाव्हरे यांना मिळाला आहे. नजीकच्या काळात अजून कांद्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे.''

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: high market price of onion in agricultural produce market committee at manchar