‘एफटीआयआय’मध्ये उच्चांकी अर्ज

‘एफटीआयआय’मध्ये उच्चांकी अर्ज

पुणे -  चित्रपट आणि कलेच्या क्षेत्रातील अग्रगण्य अशा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अकरा अभ्यासक्रमांतील 110 जागांसाठी यंदा सर्वाधिक म्हणजे सहा हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. यात अभिनयाला सर्वाधिक मागणी असून, पाठोपाठ दिग्दर्शनाचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. गेल्या वर्षी या जागांसाठी पाच हजार 292 जणांनी अर्ज केले होते. 

"एफटीआयआय'मध्ये अभिनय, दिग्दर्शन, चित्रपटनिर्मिती, संहितालेखन, कला छायाचित्रण, निर्मिती, संपादन आदी 11 अभ्यासक्रम आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी सुमारे दहा जागा आहेत. त्यात प्रवेशासाठी जम्मू-काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होतात. त्यामुळे या संस्थेत प्रवेशासाठी गुणांची तीव्र स्पर्धा असते. "एफटीआयआय'मध्ये प्रवेश मिळावा, यासाठी यंदा देशातून सर्वाधिक सहा हजार 125 अर्ज आले आहेत. त्यापैकी पडद्यावरील अभिनयासाठी एक हजार 981, तर दिग्दर्शन आणि पटकथालेखनासाठी एक हजार 280 अर्ज आले आहेत. सिनेमॅटोग्राफीसाठी 884 अर्ज आले आहेत. टेलिव्हिजन आणि इलेक्‍ट्रॉनिक विभागासाठी टीव्ही दिग्दर्शन आणि प्रोड्युसिंग व दिग्दर्शनासाठी 388 व इलेक्‍ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफीसाठी 352; तर व्हिडिओ एडिटिंगसाठी 199 जणांनी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या 833 ने वाढली आहे. प्रवेशाची प्रक्रिया एफटीआयआय व सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय) यांच्यातर्फे फेब्रुवारी 2019 पासूनच सुरू झाली आहे. सुरवातीला ऑल इंडिया जॉइट एन्ट्रन्स टेस्ट (जेट) प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर ओरिएन्टेशनसाठी कोर्सेसनुसार वेगवेगळ्या संकल्पना देऊन प्रोजेक्‍ट तयार करणे, त्यामध्ये निवड होणे आणि शेवटच्या टप्प्यात मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होऊन गुणांनुसार 110 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होईल. 

चित्रपट क्षेत्राबद्दलचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणात "एफटीआयआय'चा लौकिक आहे. येथे प्रवेश मिळणे प्रतिष्ठेचे समजले जाते. तसेच, सोशल मीडियामुळेही यंदा इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. "एफटीआयआय'ने गेल्या 21 महिन्यांत 25 पेक्षा जास्त शहरांत 125 पेक्षा अधिक प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. तसेच, खासगी संस्थांच्या तुलनेत "एफटीआयआय'चे शुल्क कमी असल्यामुळेही संस्थेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. 
- भूपेंद्र कैंठोला, संचालक, एफटीआयआय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com