
पिंपरी : महापारेषणच्या अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड झाल्याने आयटीनगरी हिंजवडीतील वीजपुरवठा रविवारी (ता.६) खंडित होऊन नंतर विस्कळित झाला. त्यामुळे येथील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. फेज २ मध्ये भूमिगत वीजवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने सोमवारी (ता.७) हिंजवडीतील नागरिक व कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचे पुरते हाल झाले. वारंवार वाहतूक कोंडी, पावसामुळे जलकोंडी आणि आता वीज कोंडी अशा समस्यांमुळे आयटी कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांचे हाल होत आहेत.