कॅमेऱ्यांच्या कक्षेत हिंजवडी आयटी पार्क

कॅमेऱ्यांच्या कक्षेत हिंजवडी आयटी पार्क

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आता सुरक्षित होणार असून, या भागातील २५ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. 

वस्तुस्थिती काय? 
हिंजवडी आयटी पार्कमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा विषय २०१० पासून प्रलंबित आहे. सध्या या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने लूटमारीचे प्रकार, अपघात आदींचा तपास करणे पोलिसांना अवघड जाते; तसेच या परिसरात होणारी कोंडी सोडविण्यासाठी शिवाजी चौकात चक्राकार वाहतूक राबवण्यात येत आहे. मात्र, तिथे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कॅमेरे बसविल्यानंतर नियम तोडणाऱ्यांवर सहज कारवाई करता येणार आहे. 

आयटी कंपन्यांसाठी काम करणाऱ्या हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने आयटी पार्कमध्ये कॅमेरे बसविण्याबाबत नऊ वर्षांपासून सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. यासंदर्भात गृह मंत्रालय, पोलिस आयुक्‍त, पुण्याचे पालकमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. अखेरीस त्याला मुहूर्त मिळाला असून २०२० मध्ये हे काम पूर्ण  करण्यात येणार आहे. 

स्मार्ट सिटीअंतर्गत उपक्रम 
हिंजवडीमधील राजीव गांधी इन्फोटेक पार्क परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) स्मार्ट सिटीला १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. हे कॅमेरे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत. पुढल्या तीन वर्षांत हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रोसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी ही सेवा कार्यान्वित होणार आहे. 

ठिकाणे निश्‍चित
आयटी पार्कमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी वाहतूक पोलिस आणि महापालिका यांनी सर्व्हेक्षण केल्यानंतर ठिकाणे निश्‍चित केली आहेत. आयटी पार्कमध्ये शिवाजी चौक, विप्रो सर्कल, इन्फोसिस सर्कल, प्रस्तावित मेट्रो स्टेशनचा परिसर, चांदे-नांदेकडून येणारा रस्ता, माण रस्ता यांचा त्यात समावेश आहे. 

आयटी पार्कमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा परिसर सुरक्षित होणार आहे. आयटी कंपन्यांनी आपल्या सुरक्षेसाठी आवारात कॅमेरे बसवले आहेत. आता बाहेरील परिसरात कॅमेरे बसविण्यात येणार असल्यामुळे या परिसरातील हालचालींवर पोलिसांना नजर ठेवणे सहज शक्‍य होणार आहे. 
- कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com