
पिंपरी : यंदा पावसाळ्याच्या तोंडावर हिंजवडीत जलकोंडी झाल्याने सर्वच स्तरांमधून प्रशासनावर टीका झाली. या भागातील विविध प्रशासकीय विभागांमध्ये ताळमेळ नसल्याचा आरोपही झाला तर दुसरीकडे हिंजवडीला पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याच्या मागणीनेही जोर धरला. या जनरेट्यामुळे राज्य सरकारने हिंजवडीला पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. याबाबतची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.