पुणे : आयटी क्षेत्रात काम करणारे दोन उच्चशिक्षित तरुण... इतिहासाचे वेड अन् ध्यास हा दोघांमधला समान धागा... यातूनच दोघांनी एकत्र येत आपला गौरवशाली इतिहास गोष्टीरूपाने अन् रंजकपणे लोकांसमोर सादर करण्याचे ठरवले... पाहता पाहता आता ही गोष्ट शंभरीपार गेली आहे.
या तरुणांचे नाव आहे सारंग मांडके व सारंग भोईरकर आणि त्यांनी हाती घेतलेल्या या अनोख्या उपक्रमाचे नाव आहे ‘गोष्ट इथे संपत नाही.’ मराठ्यांच्या इतिहासातील एखादी घटना निवडायची आणि मग त्याला प्रभावी सादरीकरणाची जोड देऊन प्रेक्षकांसमोर सादर करायची, असे या उपक्रमाचे स्वरूप. या दोघांच्याही उत्तम संवादकौशल्य आणि प्रभावी सादरीकरणामुळे हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या कार्यक्रमाचे आता शंभरहून अधिक प्रयोग झाले आहेत.
पाठ्यपुस्तकात शिकविल्या जाणाऱ्या इतिहासातील घटनांचे परिणाम, त्यातून निर्माण होत गेलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आणि यातून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत जाणारा ऐतिहासिक वारसा, हा या कार्यक्रमाचा मूळ गाभा आहे. मराठ्यांच्या इतिहासावर आधारित वेगवेगळ्या बारा विषयांवर हा कार्यक्रम आधारित असतो.
यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा काढलेला कोथळा, छत्रपती संभाजी महाराजांच्या लढाया, पेशवाईतील पराक्रम अशा अनेक घटनांचा समावेश असतो. हे सादरीकरण करताना सारंग मांडके आणि सारंग भोईरकर हे त्या संदर्भात येणारे नकाशे, सनावळी, मुलखाची नावे या बाबी दृकश्राव्य माध्यमातून दाखवतात. त्यामुळे हे सादरीकरण देखणे होते.
किल्ल्यांवरही सादरीकरण
हा इतिहास जेथे घडला, त्या ऐतिहासिक स्थळांवर जाऊन सादरीकरण करण्याची कल्पना सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांना सुचली. त्यातूनच सिंहगड, पन्हाळगड, राजगड आदी किल्ल्यांवर जाऊन त्यांनी सादरीकरण केले आहे. शनिवारवाड्यातही त्यांनी हा कार्यक्रम सादर केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.