#PMCIssue फ्लेक्‍सबाजीला दणका

#PMCIssue फ्लेक्‍सबाजीला दणका

पौड रस्ता - कोथरूडमधील होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीचे पेव नागरिकांच्या चर्चेपुरतेच मर्यादित होते; मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओने झोपेचे सोंग सोडून खडबडून प्रशासन जागे झाले आणि कारवाईसाठी सरसावले; मात्र ३० फ्लेक्‍स, १२५ छोटे फलक हटविण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई झालेली नाही. हे फलक अधिकाऱ्यांनाच का बरे दिसेनात कि अधिकारी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करतात, असे अनेक प्रश्‍न नागरिकांनी सोशल मीडियावर लावून धरले होते.   

कोथरूडमध्ये होर्डिंग, फ्लेक्‍स, बॅनरबाजीने विद्रुपीकरण वाढले आहे. कोथरूड पोलिस ठाणे, मृत्युंजय मंदिर, कर्वे पुतळा चौक, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बेलकेनगर परिसर, सुतार दवाखाना परिसर, वनाज कॉर्नर, किनारा चौक, आयडीयल कॉलनी, एमआयटी कॉलेज, मोरे विद्यालय चौक, केळेवाडी पौड फाटा, कोथरूड डेपो या परिसरात मोठ्या प्रमाणांत फ्लेक्‍सचे अतिक्रमण झाले आहे. यात राजकीय पुढारी आघाडीवर आहेत. यामुळे नागरिकांतून संतापाची भावना उमटत होती. त्यातून रविवारी (ता. ११) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेक नागरिकांनी त्यावर पोस्ट करून तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासन पुन्हा जागे झाले आणि अनधिकृत फलक हटविण्यात आले; मात्र कारवाई कोणावरही झालेली नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी ते जैसे थेच होते.   

गेली चौदा वर्षे मी कोथरूडमध्ये राहतो; पण इतके विद्रूप स्वरूप कधी बघितले नव्हते. अनधिकृत फलकांचा बाजार म्हणजे कोथरूड असे समीकरण झाले आहे. डोळ्यांना आणि मनाला हे फार बोचू लागले. शेवटचा उपाय म्हणून व्हिडिओमधून सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतो की आता हे थांबवा.
- सुनंदन लेले, ‘सकाळ’चे स्तंभलेखक

कर्तव्यात कसूर करणाऱ्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करायला हवी. फ्लेक्‍सबाजीला आलेले उधाण पाहून हे अधिकारी राजकीय दबावाखाली काम करतात किंवा हप्ते खाऊन काम करतात, असे वाटते.
- रवींद्र चौधरी, माहिती अधिकार कार्यकर्ते

दिवाळीची सुटी असल्याने कारवाई झाली नव्हती. आता अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई करणार आहे. वर्षभरात नऊ अनधिकृत फ्लेक्‍सवर गुन्हे दाखल केले. 
- संतोष गोंधळेकर,  आकाशचिन्ह परवाना विभाग, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय

नागरिक म्हणतात...
टी. शंतनू - कामानिमित्त पुण्याच्या सर्व भागांत फिरणे होते; पण हे फ्लेक्‍सचे राज्य बघून फार विषण्ण वाटते. नेत्यांचे वाढदिवस एक वेळ समजू शकतो की हाजी हाजी करण्यात धन्यता मानणाऱ्या लोकांचे हे काम आहे. पण एक वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाचे फलक म्हणजे अतीच झाले.

सुदर्शन खरे - आपल्या जाणिवाच बधिर झाल्या आहेत. आपण इतके हतबल का झालो आहोत?

शुभम पोटफोडे - नेत्यांची भावनिक साद, आस्था, अस्मितांच्या नावावर चालणारे पोकळ राजकारण आणि हेडलाइन्स बघून राजकीय विचार ठरवणारे लोक जोपर्यंत या देशात आहेत, तोपर्यंत पोस्टरबाज लीडर हे असे करतच राहणार. पुढे ही फ्लेक्‍सबाजी मेट्रोच्या खांबांवर दिसली तर नवल वाटायला नको.

ओमकार देवचाके - महापालिकेचे आकाशचिन्हचे कर्मचारी झोपलेत किंवा पैशाची झापडे लावून बसलेत.

योगेश गायकवाड - ही फक्त कोथरूडच नव्हे, तर संपूर्ण पुणे शहराची गत आहे. इथे कायदा नाही तर मानसिकता बदलायची गरज आहे.

गणेश भुंडे - आयडियल कॉलनी परिसरात आमदार व केंद्रीय मंत्री यांचा फोटो असलेला एक फ्लेक्‍स २ ऑक्‍टोबरपासून लावलेला आहे.

सिद्धार्थ जाधव  - फ्लेक्‍स कारवाईवर महापालिकेने किती खर्च केला व अनधिकृत फ्लेक्‍समुळे महापालिकेचे किती नुकसान झाले. सातत्याने अनधिकृत फ्लेक्‍स लावणाऱ्यांची यादी, मुदत संपूनही होर्डिंग लावणाऱ्यांपैकी किती जणांना नोटिसा दिल्या याची जाहीर प्रसिद्धी करावी.

क्षितिजा होले - आकाशचिन्ह परवाना निरीक्षकांनी दुर्लक्ष केले आहे आणि पोलिसही स्वत-हून कारवाई करत नाहीत. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरच कारवाई करावी, असा नियम आहे का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com