पुणे : सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक; जीवितहानी नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

वाघोली जवळील भावडी गावात घराला आग लागून आतील सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत घर पूर्णपणे जळून खाक झाले. घरातील सर्व सदस्य सकाळीच शेतात गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाजूच्या घरातील दोन सिलेंडर ग्रामस्थांनी वेळीच बाहेर काढले. पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.

वाघोली : वाघोली जवळील भावडी गावात घराला आग लागून आतील सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत घर पूर्णपणे जळून खाक झाले. घरातील सर्व सदस्य सकाळीच शेतात गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाजूच्या घरातील दोन सिलेंडर ग्रामस्थांनी वेळीच बाहेर काढले. पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. ही घटना सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहिती नुसार, सुभाष भिकाजी भिसे यांचे हे घर आहे. सकाळी आठ वाजताच घरातील सदस्य शीतल व कांचन या महिला शेतात गेल्या तर मयूर व देविदास हे मुले शाळेत गेले होते. 8.30 च्या सुमारास घराला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी सुभाष याना कळविले. ते घरी येईपर्यंत आग खूपच वाढली होती. काही वेळाने आतील सिलेंडरचा स्फोट झाला. बाजूच्या घरात दोन सिलेंडर असल्याचे कळल्यानंतर प्रवीण कांबळे, सरपंच राहुल तांबे, मंगेश चव्हाण, बिरा श्रीराम, योगेश हंडगर यांनी बाजूच्या घरातील सिलेंडर बाहेर काढले. पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. या स्फोटामुळे बाजूच्या घराला तडे गेले. बाजूच्या घरातही त्यावेळी कोणी नव्हते. आग व स्फोटामुळे घरातील सर्व वस्तूंचा कोळसा झाला. ग्रामसेवक गणेश वळकुळे, तलाठी पांडुरंग डुंबरे हे ही घटना स्थळी त्वरित पोहचले. घराचा पंचनामाही करण्यात आला.

मंगळवार रात्री पासून या परिसरात वीज नव्हती. यामुळे सिलेंडर अथवा गॅसचा पाईप लीक झाल्या मुळेच आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी त्वरित पोलिसांना कळविले मात्र पाच तास उलटूनही पोलीस घटना स्थळी पोहचले नव्हते.

15 हजारांची त्वरित मदत
भिसे कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. घटनेस्थळी प्रवीण कांबळे यांनी मदतीसाठी आवाहन करताच 15 हजार रुपयांची मदत ग्रामस्थांतून गोळा झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home burned down in cylinder explosion at wagholi in Pune