...यासाठी गुप्तवार्ता यंत्रणा सक्षम व्हायला हवी; गृहमंत्री देशमुख यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

गुप्तवार्ता प्रबोधिनी ही राज्यातील एकमेव गुप्तवार्ता प्रशिक्षण देणारी संस्था आहे. कोणत्याही राज्यात अशी संस्था नाही, फक्‍त महाराष्ट्रात आहे. नामवंत प्रशिक्षकांकडून येथील प्रशिक्षणार्थ्यांना गुप्तवार्ताचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते.

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (ता.२०) राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी पहिल्यांदाच भेट देत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. "प्रबोधिनीला आवश्‍यक सोई-सुविधा पुरविण्यास राज्य सरकार मदत करेल.अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती बॉम्बस्फोटासाठी ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. त्यावर वेळेपूर्वी मात करण्यासाठी गुप्तवार्ता यंत्रणा सक्षम असायला हवी,'' असे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. 

देशमुख रविवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीला पहिल्यांदाच भेट दिली. यावेळी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्‍त आशुतोष डुंबरे, संचालक प्रदीप देशपांडे उपस्थित होते. देशमुख यांनी प्रबोधिनीतील विविध विभागांना भेटी देत अधिकाऱ्यांसह प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या.

अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, ऑफलाइन परीक्षेसाठी निवडा परीक्षा केंद्र!​ 

गुप्तवार्ता प्रबोधिनी ही राज्यातील एकमेव गुप्तवार्ता प्रशिक्षण देणारी संस्था आहे. कोणत्याही राज्यात अशी संस्था नाही, फक्‍त महाराष्ट्रात आहे. नामवंत प्रशिक्षकांकडून येथील प्रशिक्षणार्थ्यांना गुप्तवार्ताचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण संस्थेसारख्या सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली. 

देशमुख म्हणाले, "प्रत्येक राज्यात खालपासून वरपर्यंत गुप्तवार्ता यंत्रणा आवश्‍यक आहे. अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्या शक्‍ती बॉम्बस्फोटासाठी ड्रोनसारख्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. अशा गोष्टींवर वेळेपूर्वी मात करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी गुप्तवार्ता यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. येथे प्रशिक्षण घेतलेले अधिकारी भविष्यात राज्याची आणि देशाची सेवा करतील.'' 

शिक्षक भरतीबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत; हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न सुटणार?​

दरम्यान, डुंबरे यांनी संस्थेच्या प्रशिक्षणाबाबतची माहिती यावेळी दिली. तर देशपांडे यांनी प्रबोधिनीमध्ये देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या आराखड्यात काळानुरूप बदल करून राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ, प्रशिक्षक येथे मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पळसुले यांनी केले. 

गृहमंत्री देशमुख यांनी राज्य राखीव पोलिस बलाच्या कार्यालयासही आवर्जून भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, समादेशक निवा जैन यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी देशमुख यांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh visited State Intelligence Academy