esakal | 'होम मिनिस्टर'चा राग काढण्यासाठी गृहमंत्र्यांची येरवडा जेलमध्ये पैठणी खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

home minister anil deshmukh yerwada jail visit paithani

'थर्टी फर्स्ट'च्या रात्री महाराष्ट्र पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या जबाबदारीमुळे मी पोलिस नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांसोबत होतो. पत्नी, कुटुंबासोबत मला राहता आले नाही.

'होम मिनिस्टर'चा राग काढण्यासाठी गृहमंत्र्यांची येरवडा जेलमध्ये पैठणी खरेदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे Pune News : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी शुक्रवारी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाला Yerwada Jail भेट दिली. या ठिकाणी बंदीवानांच्या श्रमातून बनणाऱ्या अनेक वस्तुंचे विक्री केंद्र आहे. याच केंद्रातून गृहमंत्री देशमुख यांनी तुरुंगातील बंद्यांनी विणलेली पैठणी आपल्या पत्नीसाठी खरेदी केली. पैठणी घेतल्यानंतर देशमुख यांनी आग्रहाने त्याची साडे नऊ हजार रुपये ही किंमतही अदा केली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'वाट चुकलेल्यांना मुख्य प्रवाहात आणू'
पैठणी खरेदीबद्दल विचारले असता देशमुख म्हणाले की, तुरुंगात येणारा प्रत्येकजण जन्मजात किंवा सराईत गुन्हेगार असतोच असे नाही. संतापाच्या भरात किंवा परिस्थितीमुळे काहींच्या हातून गुन्हा घडून जातो. त्यानंतर न्यायदेवतेने सुनावलेली शिक्षा ते भोगत असतात. पण म्हणून त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावला जात नाही. केलेल्या चुकीची शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना पुन्हा समाजात सामावून घ्यायचे असते. त्या वेळी त्यांना तुरुंगात केलेल्या श्रमदानाचा स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उपयोग होऊ शकतो. या केंद्रातून होणाऱ्या वस्तु विक्रीतून त्यांना मिळणारे उत्पन्न तुरुंगाबाहेरील नवे आयुष्य जगण्यास मदतीचे ठरू शकते, याच भूमिकेतून मी येरवडा कारागृहातील कैद्यांनी विणलेली पैठणी विकत घेतली. "नागरिकांनीही या केंद्रातून त्यांच्या गरजेच्या वस्तू नियमित खरेदी कराव्यात. आपल्याच समाजातल्या वाट चुकलेल्या लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल," असे आवाहनही देशमुख यांनी या वेळी केले.

'थर्टी फर्स्ट' पोलिसांसोबत
'थर्टी फर्स्ट'च्या रात्री महाराष्ट्र पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या जबाबदारीमुळे मी पोलिस नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांसोबत होतो. पत्नी, कुटुंबासोबत मला राहता आले नाही. त्यामुळे 'घरच्या मुख्यमंत्र्यां'चा लटका राग काढण्यासाठीही मला पैठणीचा उपयोग होईल, अशीही मिश्किल टिप्पणी गृहमंत्री देशमुख यांनी या वेळी केली.

loading image