करकंब गटात दुरंगी काट्याची टक्कर

करकंब गटात दुरंगी काट्याची टक्कर

Published on

KRK26B03763
KRK26B03764
करकंब ः येथे होम टू होम प्रचारादरम्यान मतदान यंत्राबाबत व मतदान करण्याबाबत माहिती सांगताना बाळासाहेब देशमुख यांच्या पत्नी रजनीताई देशमुख व इतर महिला. (दुसऱ्या छायाचित्रात) आदिनाथ देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख व इतर महिला.


KRK26B03760 आदिनाथ देशमुख
KRK26B03761 बाळासाहेब देशमुख

करकंब गट

भावा-भावांच्या लढतीत जावा-जावांची प्रचारात आघाडी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायतींची रंगीत तालीम


सूर्यकांत बनकर : सकाळ वृत्तसेवा
करकंब, ता. ४ : पंढरपूर तालुक्यात हाय होल्टेज लढत ठरलेल्या करकंब जिल्हा परिषद गटात दोन सख्ख्या चुलत भावांत काट्यांची टक्कर होत आहे. विशेष म्हणजे दोघेही पक्षांतर करून निवडणूक लढवीत असल्याने त्यांचे चिन्ह बदलले असले तरी लढत मात्र कायम राहिली आहे. या लढतीत दोघांच्याही घरातील महिलांनीही प्रचारात आघाडी घेतली असून त्या तहान भूक हरपून पायाला भिंगरी बांधून मतदार संघ पिंजून काढत आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख व सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख या सख्ख्या चुलत भावांमध्ये लढत होत आहे. जिल्हा परिषद गटावर सलग दहा वर्षे बाळासाहेब देशमुख यांची सत्ता राहिली आहे. तर ग्रामपंचायतीवर आदिनाथ देशमुख यांनी वर्चस्व राखले आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत सर्वच निवडणुकीत पांडुरंग परिवाराने मारुती देशमुख आणि बाळासाहेब देशमुख यांना विश्वासात घेऊनच करकंब भागातील राजकारण केले. सलग दोन वेळा त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन रजनीताई देशमुख यांना महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती पदही दिले. पण यावेळी त्यांचे कट्टर विरोधक आदिनाथ देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला आणि करकंबच्या राजकरणात ट्विस्ट निर्माण झाला. त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रथमच पांडुरंग परिवाराने बाळासाहेब देशमुख यांना उमेदवारी नाकारली आणि आजपर्यंत विरोधात राहिलेल्या पण निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या आदिनाथ देशमुख यांना उमेदवारी दिली. परिणामी बाळासाहेब देशमुख यांनीही पांडुरंग परिवारापासून फारकत घेत राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादीकडून आमदार अभिजित पाटील यांचे गावभेट दौरे आणि प्रचार सभा सुरू आहेत. तर भाजपकडून प्रशांत परिचारक आणि रणजितसिंह शिंदे यांनी कंबर कसली आहे. बाळासाहेब देशमुख हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर तर आदिनाथ देशमुख ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांच्या जोरावर मते मागत आहेत. दोन्ही उमेदवारांबरोबरच दोघांच्याही घरातील महिलांनीही प्रचारासाठी पदर खोचला आहे. बाळासाहेब देशमुख यांच्यासाठी त्यांच्या पत्नी महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती रजनीताई देशमुख व भावजय बबिता देशमुख ह्यांनी स्वतंत्रपणे प्रचारात आघाडी घेतली असून सहकारी महिलांसोबत होम टू होम प्रचारावर भर दिला आहे. दुसरीकडे आदिनाथ देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख व भावजय कल्पना देशमुख यासुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. विशेष म्हणजे दोघीही विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत. दोन्ही गटातील महिलांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवत जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे पुरुष उमेदवारांसाठी प्रचारात महिलांनी प्रथमच घेतलेली आघाडी हा चर्चेचा विषय ठरला आहे.

निवडणूक जिल्हा परिषदेची; तयारी मात्र ग्रामपंचायतीची
पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या करकंब ग्रामपंचायतीची मुदत ह्या महिन्याच्या अखेरीस संपत आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी प्रशासक नेमला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर होणाऱ्या होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवेळी येथीलही निवडणूक होणार हे निश्चित आहे. साहजिकच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव ग्रामपंचायत निवडणुकीवर पडणार आहे. त्यामुळे दोन्ही देशमुख बंधूंकडून आताच्या निवडणुकीकडे ग्रामपंचायतीची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले जात आहे.

करकंब गणातही चुरस
पंचायत समितीसाठी करकंब गणातून विद्यमान पंचायत समिती सदस्य राहुल पुरवत यांना पांडुरंग परिवाराने पुन्हा एकदा संधी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उद्योजक तथा तंटामुक्तीचे अध्यक्ष अमोल शेळके यांच्या कन्या बीएस्सी ऍग्रीची पदवी घेतलेल्या श्रद्धा अमोल शेळके यांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे गणातही मोठी चुरस निर्माण झाली आहे. करकंब गटातील उंबरे गणातून भाजपतर्फे माणिक माने तर राष्ट्रवादीकडून शहाजी मुळे निवडणूक लढवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com