आमच्या इथे डिपॉझिट जप्त करून मिळेल...

मिलिंद संगई
Wednesday, 30 October 2019

आमच्या इथे डिपॉझिट जप्त करून मिळेल..... एखाद्या व्यवसायाच्या जाहिरातीला शोभेल अशा प्रकारचे फ्लेक्स बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

बारामती शहर - आमच्या इथे डिपॉझिट जप्त करून मिळेल..... एखाद्या व्यवसायाच्या जाहिरातीला शोभेल अशा प्रकारचे फ्लेक्स बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

हे फ्लेक्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासह सर्व विरोधी उमेदवारांना मोठ्या मताधिक्‍याने पराभूत करून त्यांचे डिपॉझिट जप्त केले.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अजित पवार वगळता इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्या संदर्भातले आदेशही काढले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ म्हणून गोपीचंद पडळकर यांना बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात लढण्यासाठी पाठवले होते . भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही हा निर्णय पटला नाही हेच या निकालाने सिद्ध झाले. गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारात कोणीही फारसे उत्साहाने न उतरण्याचा परिणाम भाजपला दारुण पराभवात भोगावा लागला.

पडळकर यांच्या उमेदवारीबाबत स्थानिक नेत्यांना फारसे विश्वासात न घेता वरिष्ठ पातळीवरून निर्णय झाल्यामुळे, भाजपचे बारामतीत अजित पवारांनी अक्षरशः पानिपत केले. आमच्याकडे डिपॉझिट जप्त करून मिळेल अशा आशयाचे फ्लेक्स लावत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा समाचार घेतला. अजित पवार यांचे बारामतीवर किती निर्विवाद वर्चस्व आहे हेच पुन्हा एकदा या निकालाने स्पष्ट केले ही भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hording Deposit baramati Ajit Pawar Politics