चाकण - बहुळ, ता. खेड गावच्या हद्दीतील फुलसुंदर वस्ती येथे रात्री दीडच्या सुमारास पाच ते सहा चोरटयांनी घरात प्रवेश करून घरातील दोघा पती-पत्नीवर चाकूने छातीवर, पोटावर वार केले. चाकू सुरीच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भोसरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरातील दोघा ज्येष्ठांनाही मारहाण करण्यात आली.
दरोडेखोरांच्या चाकू हल्ल्यात अशोक जयराम वाडेकर (वय -35 वर्ष) व त्यांची पत्नी उज्वला अशोक वाडेकर ( वय -32 वर्षे) हे दोघे पती, पत्नी गंभीर जखमी झाले आहेत . त्यांच्या आई-वडिलांनाही चोरटयांनी काठीने मारहाण केली.
चोरटयांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे एक लाख बत्तीस हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला यामध्ये रोख 12 हजार रुपये लांबविले. याबाबत जयराम वाडेकर (वय -67 वर्ष) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बहुळ, ता. खेड गावच्या हद्दीतील फुलसुंदर वस्ती येथे रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. अशोक व त्याची पत्नी तसेच त्यांची आई, वडील, दोन लहान मुले हे रात्री साडेदहाच्या सुमारास झोपले होते.
रात्री दीडच्या सुमारास जयराम वाडेकर हे झोपलेल्या खोलीत एक चोरटा त्यांच्या अंथुरणाजवळ बसला होता व त्याने 'गप पडून राहा नाहीतर चाकूने भोकशील; असे बोलून त्याने धमकी दिली. बेडरूम मधील कपाट व पत्र्याच्या पेट्या काढून चोरट्यानी पाहणी केली. त्यातील दागिने व ऐवज लांबवीला.
जयराम यांची पत्नी शालन यांनी 'आम्हाला मारू नका' अशीही विनवणी चोरट्याना केली.पाच ते सहा जणांनी एकत्र येऊन अशोक व त्यांची पत्नी उज्वला हे झोपलेल्या खोलीचा दरवाजा कटवण्याने उघडला. अशोक व त्यांच्या पत्नीने 'तुम्ही कोण आहे' असे बोलत असताना त्यांच्यापैकी दोघांनी त्यांच्या सुनेच्या, मुलाच्या पोटात चाकू भोकसले.
शालन यांनी माझ्या सुनेला, मुलाला मारू नका अशी विनवणी केली. शालन यांच्याही मांडीवर चोरट्याने काठीने मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी काढून घेतले. त्यानंतर अशोक व उज्वला यांच्या छातीवर व पोटामध्ये चाकू लागल्याने रक्त मोठ्या प्रमाणात येऊ लागले.
आरडा, ओरडा केल्यानंतर चोरटे पळून जाऊ लागले आणि त्यांनी घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावली. पाच ते सहा जणांनी घराच्या मुख्य दरवाजाची कडी वाकवून घरात प्रवेश केला.चोरट्यानी अशोक व त्याच्या पत्नीच्या छातीवर, पोटावर चाकू सुरीने सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला.
हे कुटुंब शेतकरी आहे. जयराम व त्यांची पत्नी शेती करतात अशोक हा सणसवाडी येथे कंपनीत काम करतो. त्याची पत्नी उज्वला ही शेती करते. अशोक व त्याची पत्नी हे दोघे शिवनेरीला गेले होते. तेथून ते रात्री दहाच्या सुमारास घरी आले. रात्री घरी आल्यानंतर त्यांनी एकत्र जेवण केले.रात्री साडेदहाच्या सुमारास ते झोपी गेले होते.
अशोक व उज्वला यांच्या सहा वर्षाच्या मनस्वी ह्या मुलीला व चार वर्षाच्या चैतन्य या मुलाला चोरट्यानीं हातानी पकडून ठेवले होते व गप बसायला लावले होते. चोरटयांनी अशोक व उज्वला यांनी त्यांना विरोध केला म्हणून त्यांच्या छातीवर व पोटावर चाकू सुरीने वार केले. त्यामुळे त्यांच्या खोल्यांमध्ये रक्ताचे थारोळे साचले होते असे भयावह दृश्य होते
वस्तीवरील लोकांना हा प्रकार समजल्यानंतर वस्तीवरील लोक तेथे धावले व त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेटी दिल्या. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस करून चौकशी केली.
दहा ते पंधरा घरांची ही वस्ती आहे. या वस्तीवर चोरटे येण्यापूर्वी प्रथम प्रदीप तांबे या शेतकऱ्याच्या बंगल्याकडे गेले होते. तेथे खिडकी उघडण्याचा प्रयत्न ते करत होते. त्यावेळेस प्रदीप यांना ती जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी हाक मारल्यानंतर चोरटे तेथून पसार झाले व ओढ्याने पुढे गेले. वस्तीवरील घरांच्या दरवाजांच्या कड्या बाहेरून लावल्याने कोणाला काही करता आले नाही. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे आले आहेत असे शेतकरी प्रदीप तांबे यांनी सांगितले.
अशोक व त्यांची पत्नी उज्वला यांच्या छातीवर व पोटावर चाकू सुरीने मोठ्या प्रमाणात वार करण्यात आले. त्यामुळे पोटातील आतड्यांना इजा झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पाच ते सहा जणांनी हा प्रकार केला. ते सर्वजण 20 ते 25 वर्षे वयातील आहेत. ते मराठी भाषा बोलणारे होते. त्यामुळे हा प्रकार नेमका कोणत्या उद्देशाने केला याचा तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.