
तब्बल १५ वर्षांच्या खंडानंतर दोन्ही मित्र "घोडेस्वारी" या खेळ प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Horse Riding : पुण्यातील दोन मित्रांची एशियन गेमसाठी निवड
पुणे - घोडेस्वारीच्या आवडीने १५ वर्षापूर्वी अपूर्व दाभाडे आणि अक्षय लिमये एकत्र येतात. एकाच क्लबमध्ये सराव करत असल्यामुळे चांगली मैत्री होते. पुढे अपूर्व सैन्यात जातात तर अक्षय आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करतात. मात्र, निसर्गाने त्यांना पुन्हा एकत्र आणत चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेमसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.
तब्बल १५ वर्षांच्या खंडानंतर दोन्ही मित्र घोडेस्वारी या खेळ प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दोघांनीही अर्जून पुरस्कार विजेते कर्नल जी.एम. खान यांच्या क्लबमध्ये सुरवातीचे प्रशिक्षण प्राप्त केले आहे. २०११मध्ये भारतीय सैन्यात ६१ कैवलरीत सेवेत असलेले मेजर दाभाडे सांगतात, ‘वयाच्या सातव्या वर्षांपासून वडीलांच्या मार्गदर्शनात घोडेस्वारीला सुरवात केली. आणि १० व्या वर्षापासून स्पर्धेत भाग घेण्यास सुरवात केली.
मागील २५ वर्षांपासून मी घोडेस्वारी क्रिडा प्रकारात सहभाग घेत आहे. घोडेस्वारीची आवड जोपासण्यासाठी पुण्यातील सुविधा पुरेशा नव्हत्या. मी सैन्यात दाखल होत घोडेस्वारीत नैपुण्य प्राप्त केले.’ फर्ग्युसन रस्त्यावर रहिवासी असलेले लिमये सांगतात, ‘अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर माझी घोडेस्वारीची आवड जोपासण्यासाठी ॲम्बसी इंटरनॅशनल रायडींग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. २०१९ पासून विविध स्पर्धांमध्ये मी सहभाग नोंदविला.
मागील पाच महिन्यांच्या खडतर परीक्षणानंतर आमची सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एशियन गेमसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे अपूर्व दाभाडे यांचीही भारतीय संघात निवड झाली आहे.’ भारतीय संघाची इक्वेस्ट्रियन फेडरेशन ऑफ इंडियाने निवड घोषित केली असून, चीनच्या हांगझोऊ प्रांतात २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोंबर दरम्यान एशियन गेम पार पडणार आहे.