#PMCHospital रुग्णालयातील सुविधा केवळ फलकावरच! 

सुषमा पाटील 
रविवार, 2 डिसेंबर 2018

मातोश्री मीनाताई बाळासाहेब ठाकरे दवाखान्यातील समस्या लवकरात लवकर सोडवून रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 

- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

रामवाडी : "इथे सोनोग्राफी, नेत्र-रक्त-लघवी तपासणी मोफत केली जाईल.'...रुग्णालयाबाहेरचा हा फलक वाचून कोणाही रुग्णाला नक्कीच हायसं वाटेल; पण प्रत्यक्षात रुग्णालयात पाऊल ठेवताच यातील एकही सुविधा इथे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येईल, तेव्हा... होय, अगदी अशीच परिस्थिती आहे महापालिकेच्या वडगाव शेरीतील मातोश्री मीनाताई बाळासाहेब ठाकरे दवाखान्यातील. यामुळे या परिसरातील रुग्णांबरोबरच गर्भवतींना अन्य रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. 

हा दवाखाना महापालिकेने फेब्रुवारी 2017 मध्ये सुरू केला. दवाखान्यात सोनोग्राफी, डोळे-रक्त-लघवी-दंत तपासणीसह विविध उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. प्रारंभी काही महिने या सर्व सुविधा रुग्णांना व्यवस्थित मिळत होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तज्ज्ञ डॉक्‍टरांचा अभाव तसेच यंत्रणेतील बिघाडामुळे या सुविधांपासून रुग्णांना वंचित राहावे लागत आहे. दवाखान्याच्या प्रवेशद्वारालगत सुविधांबाबतची माहिती देणारा फलक आहे. सुविधा मात्र औषधालाही शिल्लक नसल्याचे दवाखान्यात गेल्यावर कळते. त्यामुळे गरजू रुग्ण तसेच गर्भवतींना नाईलाजास्तव अन्य शासकीय अथवा खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे. 

सोनोग्राफीसाठी आवश्‍यक असलेला "नेट पॅक' संपल्याने सोनोग्राफी विभाग दोन महिन्यांपासून बंद आहे. मात्र याची कल्पना नसल्याने अनेक गर्भवती सोनोग्राफी करण्यासाठी दवाखान्यात येतात. पर्यायाने त्यांना येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात जाण्याचा सल्ला येथील कर्मचारी देतात. या प्रवासात गर्भवतींना अनेकदा त्रास होतो. 

दरम्यान, वर्षभरापासून नेत्र तज्ज्ञांची नियुक्ती न केल्याने नेत्र तपासणी विभाग बंद आहे. रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने तपासणीसाठी येथे पुरेसे साहित्य नसल्याने खराडी येथील प्रयोगशाळेत नमुणे पाठवले जातात. या बाबत, बाह्यरुग्ण विभागाच्या डॉ. मनीषा सुलाखे म्हणाल्या, ""दवाखान्यात महिन्याला 15 ते 20 गर्भवतींची सोनोग्राफी होत असते. केवळ नेट पॅक संपल्यामुळे सध्या सोनोग्राफी विभाग बंद आहे.'' 

- दोन महिन्यांपासून सोनोग्राफी मशीन बंद 
- तज्ज्ञ डॉक्‍टरांचा अभाव 
- एक वर्षापासून नेत्र तपासणी विभाग बंद 
- रक्त-लघवीचे नमुणे तपासणीसाठी अन्यत्र 

महापालिकेकडून बजेट घेऊन रुग्णालयाच्या मोठ्या इमारती बांधल्या जातात; परंतु तिथे कुठल्याही प्रकारच्या सोयी नागरिकांना उपलब्ध होत नाहीत, ही शोकांतिका आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले पाहिजे. ठाकरे दवाखान्यातील सर्व सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात. 

- नीता गलांडे, रहिवासी

Web Title: Hospital facilities only on Board