

कपडे धुण्यासाठी ६०० किलोमीटरची धाव!
कोल्हापूर जिल्ह्यातून पुण्यापर्यंत रुग्णालयातील कपड्यांची वाहतूक
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : जिल्ह्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालयांमधील रुग्णांसाठी वापरण्यात आलेले कपडे धुण्यासाठी तब्बल ६०० किलोमीटरचा प्रवास घडविला जात आहे. डोंगरी तालुक्यातील रुग्णालयांमधील कपडे थेट पुण्यातील लॉन्ड्रीकडे धुलाईसाठी नियमित पाठविले जात असल्याची माहिती आहे. यासाठी कपड्यांच्या वाहतुकीसह धुलाईवर वर्षाकाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. स्थानिक पातळीवरच कपडे धुण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणे शक्य असताना त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसीमधून एक वाहन दोन कर्मचाऱ्यांसह ग्रामीण रुग्णालयांकडे रवाना होते. हे वाहन १० ते ५० किलोमीटरचा प्रवास करून रुग्णालयात पोहोचते. तेथील कर्मचारी अशा कपड्यांच्या पिशव्या वाहनात भरतात. एका दिवसात सात ते दहा रुग्णालयांमधून कपडे गोळा केले जातात. त्यानंतर हेच वाहन पुन्हा शिरोली एमआयडीसीत येते. जमा केलेले कपडे येथे दुसऱ्या वाहनात भरले जातात आणि हे वाहन पुणे-तळेगावच्या दिशेने जाते. तळेगाव येथील लॉन्ड्रीमध्ये आधुनिक यंत्रणेद्वारे कपडे धुतले जातात. धुलाईनंतर त्याच मार्गाने कपडे पुन्हा कोल्हापूरला आणले जातात आणि त्यानंतर दुसऱ्या वाहनातून संबंधित ग्रामीण रुग्णालयांमध्ये पोहोचविले जातात. डोंगरी व दुर्गम भागातील काही ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने धुलाईसाठी अनेकदा चार-पाच कपडे जमा होतात. मोजक्या कपड्यांसाठीही वाहन संबंधित रुग्णालयापर्यंत जाते. कपडे घेऊन पुन्हा कोल्हापूरला येते आणि त्यानंतर तेच कपडे पुण्याला पाठविले जातात. केवळ कपडे धुण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास घडतो.
स्थानिक लॉंड्रीकडे दुर्लक्ष का?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘आनंद’ नावाच्या कंपनीकडे धुलाईचे कंत्राट असून ‘सिंम्प्ली’ नावाच्या कंपनीकडून कपड्यांची वाहतूक केली जाते. प्रत्येक तालुक्यात कपडे धुण्याची सुविधा देणारे लॉन्ड्री व्यावसायिक आहेत. स्थानिक पातळीवरच हे काम करून घेतल्यास सध्याच्या खर्चाच्या तुलनेत निम्म्या खर्चात धुलाई शक्य आहे. एकाच खासगी कंपनीलाच कंत्राट देण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न चर्चेत आहे.
कोल्हापुरातच कपडे धुलाई प्रकल्प सुरू केल्यास खर्च वाचणार आहे. त्यामुळे कंपनीला स्थानिक पातळीवर प्रकल्प सुरू करण्यास टाळाटाळ का केली, याचा शोध घेण्याचे आव्हान सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांसमोर आहे.
-------------
शासकीय रुग्णालयांकडील कपडे धुण्याचे कंत्राट खासगी कंपनीकडे आहे. संबंधित कंपनी बाहेरील जिल्ह्यातील प्रकल्पातून कपडे धुऊन आणते. त्यांना कोल्हापुरातच कपडे धुलाईचा प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत.
- डॉ. दिलीप माने, आरोग्य उपसंचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.