esakal | पोट भरणारेच राहिले उपाशी; हॉटेल व्यावसायिकांचे प्रशासनाने थकवले बिल
sakal

बोलून बातमी शोधा

Money

पोट भरणारेच राहिले उपाशी; हॉटेल व्यावसायिकांचे प्रशासनाने थकवले बिल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना (Corona) काळात एकीकडे हजारो हात मदतीसाठी (Help) पुढे येत आहेत. एवढेच नव्हे, चूक झाल्याचे लक्षात येताच, चोरानेदेखील रेमडिसिव्हर इंजेक्शन पुन्हा आणून जागेवर ठेवले. अशी एक ना अनेक उदाहरणे समोर येत असताना, दुसरीकडे मात्र शहरातील सत्तरहून अधिक हॉटेल व्यावसायिकांचे (Hotel Businessman) थकलेले (Arrears) १८ कोटी रुपयांचे बिल केवळ ‘माझे काय’ या कारणासाठी अडवून ठेवले असल्याचे समोर आले आहे. (Hotel Businessman Bill Arrears by District Administrative in Corona Period)

वारंवार विनंती करून, सर्व प्रकाराच्या मान्यता घेतल्यानंतर आणि साहेबांनी आदेश देऊनदेखील एक अधिकारी मात्र आडून बसला आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रूग्ण पुणे शहरात आढळला. त्यानंतर टप्याटप्प्याने रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. या काळात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्डबॉय यांना एक आठवडा ड्यूटी, तर एक आठवडा क्वारंटाइन ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शहरातील हॉटेल व्यावसायिकांची मदत घेण्यात आली.

हेही वाचा: बारामतीतील कोरोना स्थितीबाबत मोठी बातमी

शहरातील सत्तर हॉटेल व्यावसायिकांनी पुढे येत जिल्हा प्रशासनाला मदतीचा हात पुढे केला. पंचतारांकित हॉटेलचालकांनीदेखील एक ते दोन हजार रुपयांच्या दरावर रूम उपलब्ध करून दिल्या. एवढेच नव्हे, तर दोन वेळचे जेवण, नाष्ट्यासह या आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा दिली. जवळपास नोव्हेंबरपर्यंत या हॉटेल व्यावसायिकांनी रूम जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर त्यांचे बिल अदा करणे अपेक्षित होते. त्यावेळी मात्र जिल्हा प्रशासनाने ससून रुग्णालयाकडे बोट दाखविले. ससून रुग्णालयाने आम्ही देऊ शकत नाही असे सांगत हात वर केले. शेवटी विभागीय आयुक्तांना हस्तक्षेप करावा लागला. न्यायालयानेही तशा सूचना दिल्या. अखेर जिल्हा प्रशासनाने हे बिल देण्याचे मान्य केले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बिल मिळेल, या अपेक्षेने हॉटेल व्यावसायिक जिल्हा प्रशासनाकडे चकरा मारत आहेत. परंतु झारीतील काही शुक्राचार्य मात्र ‘माझे काय’ असा प्रश्‍न विचारत बिल देण्यासाठी आडून बसले आहे.

हॉटेल व्यावसायिकांनी सादर केलेल्या बिलाची तपासणी ससून रुग्णालयाकडून करून घेण्यात येत आहे. त्यांच्याकडून तपासणी करून आल्यानंतर तातडीने बिल अदा करण्यात येईल.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी