ओयो'च्या थकबाकीने पुण्यात हॉटेलचालक बेजार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

हॉटेल बुकिंगसाठी 'ओयो ऍप' लोकप्रिय असले तरी या कंपनीकडून होणाऱ्या बेभरवशाच्या व्यवहारामुळे पुण्यातील हॉटेलचालक बेजार झाले आहेत. त्यांच्याकडे लाखो रुपये थकले आहेत. अनेकदा मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने हॉटेलचालक मेटाकुटीला आले आहेत.

पुणे :  हॉटेल बुकिंगसाठी 'ओयो ऍप' लोकप्रिय असले तरी या कंपनीकडून होणाऱ्या बेभरवशाच्या व्यवहारामुळे पुण्यातील हॉटेलचालक बेजार झाले आहेत. त्यांच्याकडे लाखो रुपये थकले आहेत. अनेकदा मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने हॉटेलचालक मेटाकुटीला आले आहेत.

याविरोधात शिवाजीनगर येथील 'ओयो' कार्यालयाबाहेर हॉटेलचालकांनी निदर्शने केली."ओयो ऍप'वरून हॉटेलमध्ये रुम बुकींसाठी ग्राहक मिळत असल्याने पुण्यातील सुमारे 150 हॉटेलमध्ये ही सुविधा आहे. ग्राहकांना कमी किमतीमध्ये रूम मिळत असल्याने त्यास भरपूर प्रतिसाद मिळतो. रूम बुक केल्यानंतर त्यामध्ये सुमारे 15 ते 20 टक्के 'ओयो'चे कमिशन घेऊन, उर्वरित पैसे हॉटेल चालकास दिले जात होते. पण गेल्या काही महिन्यांपासून ही सेवा हॉटेलचालकांना परवडत नाही. ग्राहकांना स्वस्तामध्ये रूम देण्यासाठी दर भरपूर खाली आणले जात आहेत. ते हॉटेलला परडवत नाही.

एका भागातील सर्व हॉटेल्स 'ओयो'शी जोडल्यानंतर रुमचे भाडे अव्वाच्या सव्वा केले जात आहेत, पण त्या वाढीव रकमेचा फायदा हॉटेलचालकांना होत नाही."द फेडरेशन ऑफ हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया'चे (एफएचआरएआय) कार्यकारी सदस्य विक्रम शेट्टी म्हणाले, 'ओयो'ची सेवा घेणारे हॉटेलचालक चक्रव्यूहात अडकले आहेत. प्रत्येकाची दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम अडकली आहे. कामगारांचा पगार, वीजबिल, इमारत भाडे, इतर सेवांचा खर्च वाढत असून 'ओयो'कडून अवघ्या 500-600 रुपयात रूम दिली जात आहे. त्यातही त्यांचे कमिशन आहे. जो हॉटेलवाला तक्रार करतो, त्याचे रेट वाढवून त्याला ग्राहक मिळू देत नाहीत. तसेच वेगवेगळे कारण व शुल्क सांगून 35 टक्‍क्‍यांपर्यंत कमिशन घेत आहेत. हा सर्व व्यवहार ऑनलाइन आहे. त्यामुळे ओयोच्याच हातामध्ये रूम बुक करणे, पैसा घेणे आहे. यामुळे आम्हाला धंदा करणे अवघड झाले आहे.''

पोलिसांकडे तक्रार केली तर ते दिवाणी प्रकरण आहे म्हणून तक्रार घेत नाहीत. ही स्थिती केवळ पुण्यात नाही, तर देशातील अनेक ठिकाणी आहे. 'ओयो' विरोधात हॉटेलचालक आंदोलन करत आहेत, असे शेट्टी यांनी सांगितले.

दरम्यान, 'ओयो'चे पुण्याचे प्रमुख अखिल शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, मी यावर बोलण्यासाठी अधिकृत व्यक्ती नाही, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hotel owner in trouble due to Outstanding of Oye App in pune