

करंजे पेठेतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास
सातारा : सातारा शहरातील करंजे पेठ परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याबाबत किरण नारायण गोडसे (वय ४८, रा. ४०७, करंजे पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ या कालावधीत त्यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली आहे. चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले. यामध्ये कानातील टॉप्स, तसेच सोन्याचे पेंडल अशा एकूण २६ ग्रॅम वजनाच्या आणि ६७ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे. उपनिरीक्षक गोवेकर तपास करत आहेत.
...........
खुनाच्या प्रयत्नाचा पाच जणांवर गुन्हा
सातारा : पूर्वीच्या वादातून झालेल्या भांडणात तरुणाच्या पोटात चाकूने वार करून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर शहर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय ऊर्फ पांड्या चंद्रकांत घाडगे, प्रसाद अजय घाडगे, तानिक ऊर्फ बंटी प्रमोद कांबळे (तिघेही रा. रविवार पेठ, सातारा), गणेश शंकर गुरव व यश गणेश गुरव (दोघेही रा. मोळाचा ओढा, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी ऋतुराज तानाजी बेडकर (वय २२, रा. रविवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. घटना रात्री साडेअकराच्या सुमारास प्राथमिक शिक्षक बँकेपासून तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सचिन ज्वेलर्स दुकानाजवळील झाडाखाली घडली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पूर्वीच्या वादातून संशयितांनी रोहन ऊर्फ राज फरास याच्या पोटात चाकूने वार केला, तसेच मन्या कांबळे याच्या तोंडावर व डाव्या डोळ्याखाली मुठीने मारहाण केली. याशिवाय अक्षय शिवगण व मलाही संशयितांनी मारहाण केल्याची फिर्यादीत म्हटले आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, तसेच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.
.........
बोरखळमध्ये दोघ गटांत हाणामारी
सातारा : बोरखळ (ता. सातारा) येथे कट्ट्याला गाडी घासल्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीप्रकरणी अकरा जणांवर परस्परविरोधी गुन्हे तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. माधुरी उत्तमराव पाटील (वय ५३, रा. बोरखळ, ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुकाराम लक्ष्मण पाटील, मिथुन तुकाराम पाटील, अक्षय सयाजी पाटील (तिघे रा. बोरखळ, ता. सातारा), दत्तात्रय सदाशिव पाटील व वैभव सदाशिव पाटील (दोघे रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तुमच्या कट्ट्यामुळे आमची गाडी घासली, त्यामुळे तुम्ही हा कट्टा काढा, असे म्हणत संशयितांनी वाद घातला, तसेच मला, पती उत्तमराव व मुले विजय आणि विश्वजित यांना संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार गोरे तपास करत आहेत. दुसरी फिर्याद गिरी मिथुन पाटील (वय ४०, रा. बोरखळ) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वजित उत्तम पाटील, भरत अर्जुन साळुंखे, प्रज्वल विलासराव पाटील, उदयसिंह बाबासाहेब पाटील, अनुज बाबासाहेब पाटील व विजयसिंह उत्तमराव पाटील (सर्व रा. बोरखळ, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांची गाडी रामचंद्र कुंभार यांच्या कट्ट्याला धडकली. त्यानंतर संशयितांनी अन्य साथीदारांना बोलावून पार, टिकाव व खोऱ्याच्या साहाय्याने कट्टा पडायला सुरुवात केली. त्याबाबत विचारणा केल्यावर संशयितांनी घरावरील काचा फोडल्या. तसेच मला, पती मिथुन व सासरे तुकाराम यांना मारहाण केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
........
कोडोलीत घरातून
रोकड लंपास
सातारा : गणेशनगर, कोडोली येथे किचनच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत चोरट्याने ७४ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. भुजंगराव शंकर शेळके (रा. गणेश चौक, गणेशनगर, कोडोली) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ८ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४५ ते ९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.११ या कालावधीत ही घरफोडी झाली आहे. घरातील किचनमध्ये देवघरासमोर ठेवलेल्या पूजेच्या ताटातील कापडी पिशवीमध्ये ७४ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम ठेवली होती. चोरट्याने किचनच्या खिडकीचे गज कापून काही साधनांच्या साहाय्याने पिशवी ओढून रक्कम चोरून नेली असे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार यादव तपास करत आहेत.
.........
माजगावकर झोपडपट्टीतील मारामारीप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
सातारा : जुन्या भांडणाच्या कारणावरून कारणावरून माजगावकर झोपडपट्टी येथे झालेल्या मारामारीप्रकरणी सहा जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. विनायक सुनील साळुंखे (वय २०, रा. माझगावकर माळ झोपडपट्टी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य नामदेव चव्हाण व गणेश नामदेव चव्हाण (दोघेही रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माजगावकर माळ झोपडपट्टी परिसरातील कब्रस्तानासमोर मी घरी जात असताना संशयित आदित्य याने बोलावून घेतले. त्यानंतर जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लोखंडी शस्त्राने मारहाण केली, तसेच संशयित गणेश यानेही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार खलिफा तपास करत आहेत. दुसरी फिर्याद आदित्य नामदेव चव्हाण (वय १८, व्यवसाय मजुरी, रा. माजगावकर झोपडपट्टी, स्मशानभूमीसमोर) याने दिले आहे. याप्रकरणी प्रेम चव्हाण, विनायक साळुंखे, सौरभ पाटोळे आणि सोनू साळुंखे (सर्व रा. आकाशवाणी, माजगावकर झोपडपट्टी, स्मशानभूमीसमोर, सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घरासमोर उभा होतो. तेव्हा संशयित अॅक्टिव्हावरून तेथे आले. त्यानंतर प्रेम चव्हाण याने जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयितांनी मारहाण केल्याचे आदित्य याने फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार इंगुळकर तपास करत आहेत.
सदरबझारमध्ये एका पेंटरला मारहाण
सातारा : सदरबझार येथे कामाचे पैसे का देत नाही, असे विचारल्याच्या कारणावरून दोघांनी एका पेंटरला मारहाण करून जखमी केले आहे. दीपक दिनकर सकटे व आयुष दीपक सकटे (दोघेही रा. सदरबझार, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत विनोद गोपाळ राजपूत (वय २६, व्यवसाय पेंटर, रा. अभिनव बंगला, सवटे, जुना आरटीओ चौक, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदरबझार येथील रूमकडे जात असताना संशयितांनी गाठले. कामाचे पैसे का देत नाही, असे विचारून त्यांनी रॉड, काठी व कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करून शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. महिला हवलदार माने तपास करत आहेत.
आरफळमध्ये दांपत्याला मारहाण
सातारा : आरफळ (ता. सातारा) हॉटेलमधील पाणी पाइपद्वारे शेतात येत असल्याचे सांगितल्याच्या कारणावरून दांपत्याला मारहाण केल्याप्रकरणी हॉटेल मालकासह त्याच्या दोन मित्रांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
स्वप्नील साबळे, प्रतीक सतीश साबळे (दोघे रा. आरफळ, ता. सातारा) व शुभम शिंदे (रा. वनगळ, ता. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी रोहिणी मंगेश कदम (वय ४२, रा. आरफळ, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. हॉटेल जगदंबातील पाणी पाइपद्वारे शेतात येत असल्याचे हॉटेलच्या कामगारांना सांगितले होते. याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून हॉटेल मालक व त्याच्या दोन मित्रांनी मला व पतीला मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
..........
निगडीतील कॅनॉलमध्ये तरुणाचा मृतदेह
सातारा : सातारा तालुक्यातील निगडी येथे ग्रामपंचायतीच्या विहिरीजवळील कॅनॉलमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. कृष्ण मुरारीलाल हरी (वय ३८, रा. १२४, जयलखेडा, ता. जलेसर, जि. एटा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे.
याबाबत हणमंत रामदास पवार (वय ५०, रा. निगडी, ता. सातारा) यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. निगडी गावच्या हद्दीत भानुदास शंकर पवार यांच्या शेतासमोरील उजव्या कॅनॉलमध्ये पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे त्यांनी खबरीत म्हटले आहे. हवालदार राऊत तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.