
गृहनिर्माण सोसायट्यांनी डीम्ड कन्व्हेयन्स न केल्यास अडचणीचे ठरणार; अनिल कवडे
पुणे : राज्यातील सुमारे निम्म्याहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावावर जमीन नाही. ही बाब भविष्यात सभासदांसाठी अडचणीची ठरणार असून, सोसायट्यांनी कन्व्हेयन्स किंवा डीम्ड कन्व्हेयन्सवर करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्त अनिल कवडे (Anil Kawade) यांनी केले. तसेच, सभासदांनी स्वयंशिस्त पाळण्यासोबतच सोसायटी तंटामुक्त कशी राहील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.
पुणे जिल्हा को-ऑप हाउसिंग अँड अपार्टमेंट्स फेडरेशनच्या पिंपळे सौदागर शाखेच्या वतीने शनिवारी ‘सहकार दरबारा’चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, पिंपरी चिंचवड उपनिबंधक नवनाथ अनपट आदी या वेळी उपस्थित होते.
कवडे म्हणाले, ‘‘गृहनिर्माण सोसायट्यांनी उपविधी तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे गरजेचे आहे. सहकाराचे सूत्र कोणीही विसरू नये. पदाधिकाऱ्यांनी आपले काम निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समाजसेवेच्या दृष्टिकोनातून करावे. तसेच, सोसायटीतील सभासदांनीही पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आदर करावा.’’
फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी फेडरेशनच्या कार्याचा आढावा घेतला. फेडरेशन हे फ्रेंड, फिलोसोफर आणि गाइड म्हणून काम करत आहे. सोसायट्यांना समस्यांतून मार्ग काढण्यासाठी फेडरेशनच्या वतीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. फेडरेशनच्या मदतीने कन्व्हेयन्सच्या मुद्यावर जिल्ह्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आघाव यांनी सांगितले. महावितरणचे सहायक अभियंता सुजित ननावरे यांनी वीजपुरवठ्याशी संबंधित प्रश्नांना उत्तरे दिली.
महासंघाचे पिंपळे सौदागरचे प्रमुख चारुहास कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आयुक्त कवडे यांच्या हस्ते सुभाष ढवळे, अनिल असगेकर आणि अधिवक्ता ज्योत्स्ना जोशी यांचा सहकार दरबारातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. निवृत्त उपनिबंधक राजेंद्र पवार यांनी सहकार दरबारचा समारोप केला. गृहनिर्माण संस्थांनी सामुदायिक राहणीमान आणि विस्तारित कुटुंब ही संकल्पना राबवावी, असे आवाहन त्यांनी केले.
Web Title: Housing Societies Do Deemed Convenience Appeal Commissioner Anil Kawade Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..