अपहरणकर्ता डुग्गुला सोडून कसा पळाला? व्हिडीओ Viral

अपहरणकर्ता डुग्गुला सोडून कसा पळाला? व्हिडीओ Viral
Summary

मुलाचे पालक, पोलिस अन्‌ संवेदनशील नागरीकांनी टाकला सुटकेचा नि:श्वास

पुणे : स्वर्णव ऊर्फ डुग्गु त्याचे नावं. खेळता-बागडत राहाणारा डुग्गुला 11 जानेवारीला अचानक कोणीतरी अपहरण करून उचलून नेले. हा त्याच्या आई-वडीलांसाठी मोठा धक्का होता. एकीकडे आई पोटच्या गोळ्यासाठी रात्रंदिवस रडत होती, तर वडील मुलगा कोणीतरी आणून देईल, या वेड्या आशेने सगळ्यांकडे याचना करीत होता. या घटनेनंतर पोलिस कर्मचारीच नव्हे, तर खुद्द पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्तही मुलाला सुखरुप आणण्यासाठी रात्रंदिवस धडपडत होते. पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर होती, बघता-बघता आठ दिवस उलटले, बुधवारी नववा दिवस सुरू झाला.आता मात्र मुलाचे आई-वडीलच नव्हे, तर प्रत्येक संवेदनशील व्यक्तीचाही धीर सुटू लागला, बुधवारी दुपारी ठिक दोन वाजता अचानक नाट्यमयरीत्या मुलाच्या वडीलांना फोन आला, तुमचा मुलगा आम्हाला मिळालाय ! पुढे वडीलांनी व्हिडीओ कॉलद्वारे खात्री केली आणि अवघ्या 15-20 मिनीटातच तोच सर्वांचा लाडगा डुग्गु पुन्हा एकदा त्याच्या आई-वडीलांच्या कुशीत विसावला आणि मुलाला सुखरुप पाहून त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला !

असा घडला अपहरणाचा प्रकार

बाणेर येथील हाय स्ट्रीट रस्त्यावरील इंदू पार्क सोसायटीजवळील उद्यानाजवळून मंगळवारी 11 जानेवारीला सकाळी सव्वा दहा वाजता नातेवाईक मुलासमवेत स्वर्णव सतीश चव्हाण हा चार वर्षांचा मुलगा जवळच्याच डे केअर सेंटरला निघाला होता. तेवढ्यात दुचाकीवरुन आलेल्या एका व्यक्तीने नातेवाईक मुलाच्या हाताला झटका देऊन स्वर्णवला दुचाकीवर पुढे बसवून उचलून नेले.बालेवाडी पोलिस चौकी अगदी हाकेच्या अंतरावरच असतानाही हि घटना घडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्वर्णवचे वडील डॉ.सतीश चव्हाण यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात मुलाच्या अपहरणाबाबत फिर्याद दिली. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी, चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तपास पुढे जात नव्हता.

नवव्या दिवशी वाढली चिंता !

दरम्यान, यासंदर्भात कुठलीही माहिती बाहेर पडू नये, त्यामुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण होईल, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु होता. असे असताना मुलाच्या वडीलांकडून मुलाचे फोटो, माहिती समाजमाध्यमांवर टाकून मुलाबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत होते. हि माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाल्याने पोलिसांच्या तपासाला अडचण येत होती. दरम्यान, मुलाचे अपहरण होऊन आठ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांकडून ठोस माहिती मिळत नसल्याने मुलाचे आई-वडील, नातेवाईक चिंतेत होते. आत्तापर्यंत संयम बाळगला, मात्र मुलाच्या आठवणीने त्यांचीही चिंता वाढली. मुलगा सुखरुप परतेल, या त्यांच्या दुर्देम्य इच्छाशक्तीमुळे अजूनही ते संयम बाळगत होते.

अपहरणकर्ता डुग्गुला सोडून कसा पळाला? पाहा व्हिडीओ...

असा मिळाला स्वर्णव

दरम्यान, बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुनावळे येथील पाण्याच्या टाकीजवळ बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीजवळ अपहरण करणाऱ्या व्यक्तीने स्वर्णवला आणून सोडले. तेथील सुरक्षारक्षक दादाराव जाधव यांच्याकडे मुलाला देऊन "मी 15 मिनीटात येतो, तोपर्यंत मुलाला सांभाळा' असे सांगून ती व्यक्ती निघून गेली. त्यानंतर जाधव यांनी 15 मिनीटे वाट पाहीली. तेवढ्यात स्वर्णव रडू लागला. त्यामुळे त्यांनी तत्काळ तेथील तरुणांना हा प्रकार सांगितला. त्यांनीही 15 मिनीटे त्या व्यक्तीची वाट पाहीली. त्यानंतर डुग्गुच्या पाठीवरील सॅकवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. हा फोन डुग्गुचे वडील डॉ.सतीश यांना गेला. "तुमचा मुलगा आम्हाला मिळाला आहे' असे त्यांनी सांगितल्यानंतर डॉ. चव्हाण यांनी खात्री करण्यासाठी व्हिडीओ कॉल केला. तेव्हा, आपला मुलगा पाहून त्यांनी तत्काळ तिकडे पोचतो असे सांगितले. तसेच पोलिसांनाही खबर दिली. दरम्यान, त्याच परिसरात तपास करणाऱ्या पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसही तेथे पोचले. आपला मुलगा सुखरुप असल्याचे पाहून आई-वडीलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकतानाच अश्रूंचा बांधही फुटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com