‘रिलायन्स इन्फ्रा’ला किती वेळा मुदतवाढ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

‘रिलायन्स इन्फ्रा’ने गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केलेल्या आराखड्यानुसार पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जुलै २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ही मुदत संपली तरीही गेल्या वर्षभरात हे काम पूर्ण करता आलेले नाही.

खेड शिवापूर - ‘रिलायन्स इन्फ्रा’ने गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केलेल्या आराखड्यानुसार पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जुलै २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ही मुदत संपली तरीही गेल्या वर्षभरात हे काम पूर्ण करता आलेले नाही. या उर्वरित कामासाठी मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले; तर पुढील दोन महिन्यांत रुंदीकरणाचे काम पूर्ण करू, असे ‘रिलायन्स इन्फ्रा’चे म्हणणे आहे.

पुणे-सातारा रस्त्याच्या रखडलेल्या रुंदीकरणाच्या कामाबाबत गेल्या वर्षी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी, रिलायन्स इन्फ्रा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या वेळी उरलेले काम कधी आणि कसे पूर्ण करणार, याचा आराखडा सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी ‘रिलायन्स इन्फ्रा’ला केली होती. या वेळी या रस्त्याचे फक्त तीन टक्के काम बाकी असल्याचा दावा ‘रिलायन्स इन्फ्रा’ने केला होता. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केलेल्या आराखड्यात हे उर्वरित काम जुलै २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. 

मात्र, ही मुदत संपून गेल्यानंतरही पुणे- सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात बाकी आहेत. ही कामे कधी पूर्ण होणार? तसेच, ‘रिलायन्स इन्फ्रा’ला या कामासाठी अजून किती मुदतवाढ मिळणार? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 

या रखडलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे या रस्त्यावर अपघात, खड्डे, वाहतूक कोंडी या गोष्टींचा प्रवाशांना सामना करावा लागत आहे. गेल्या सात वर्षांत पुणे- सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी ‘रिलायन्स इन्फ्रा’ला चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. अजून पाचवी मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पावसामुळे हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करता आले नाही. मात्र, सध्या पावसाने उघडीप दिली असून, पुढील दोन महिन्यांत पुणे- सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल.
 - बी. के. सिंग,  सहव्यवस्थापक, रिलायन्स इन्फ्रा

या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रिलायन्स इन्फ्राला जास्त काम पूर्ण करता आले नाही. त्यांना मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या सुमारे पाच टक्के काम बाकी आहे. लवकरात लवकर ते पूर्ण करण्यात येईल. 
-सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 

आजपर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ
पहिली -    ३१ डिसेंबर २०१५ 
दुसरी -    ३१ डिसेंबर २०१७ 
तिसरी -    ३१ मार्च २०१८ 
चौथी -    जुलै २०१९

बाकी असलेली कामे
    वरवे, चेलाडी, धांगवडी येथील उड्डाण पुलाची अपूर्ण कामे
    सारोळा आणि वेळू येथील उड्डाण पुलाच्या एका बाजूचे काम अपूर्ण
    खेड शिवापूर येथील उड्डाण पुलाच्या कामाला अद्याप सुरवात नाही
    शिंदेवाडी ते सारोळादरम्यान सेवा रस्त्यांची कामे अपूर्ण
    पथदवे आणि ड्रेनेजलाइन अपूर्ण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How many times the Reliance Infra expires