
पिंपरी - सहारणपूर येथून लष्कराच्या ताफ्यातील शंभर घोडे पिंपरी येथील हाफकिन जीव औषधनिर्माण महामंडळात दाखल झाले आहेत. आठ महिन्यांच्या निरीक्षणानंतर जीवरक्षक लसींच्या उत्पादनांसाठी त्यांचा वापर केला जाईल. या महामंडळाकडून मागणीनुसार विविध लसींचा पुरवठा होतो.
महामंडळात १९९७ पासून विविध लसींचे उत्पादन होते. त्यामध्ये नाग, मण्यार, फुरसे, घोणस तसेच लाल रंगाच्या विंचवाच्या दंशावरील लसी आहेत. पावडर आणि द्रव या दोन्ही प्रकारची निर्मिती येथे होते. द्रव लस जास्त काळ टिकविण्यासाठी २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानाची गरज भासते. तसेच सामान्य तापमानात पावडर लस जादा काळ टिकते. त्यामुळे अशा लसींना मागणी असते.
यासाठी घोड्यांच्या रक्ताचा वापर होतो. त्यासाठी दरवर्षी घोड्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यामध्ये घोड्यांची लसींच्या उत्पादनासाठी योग्यता तपासली जाते. सध्या महामंडळात सुमारे ८०० घोडे आहेत. महामंडळाकडे राज्याकडून दरवर्षी साधारणतः दीड ते दोन लाख सर्पदंशाच्या कुप्यांची मागणी नोंदविली जाते. काही महिन्यांपूर्वीच येमेनमधूनही महामंडळाकडे कुप्यांची मागणी आली होती.
कार्यक्षमतेनुसार वापर
लष्कराकडून हिमालयीन पर्वतरांगांमध्ये घोड्यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. घोड्यांचे वाढते वयोमान लक्षात घेऊन त्याला पुनर्वसन केंद्राकडे पाठविले जाते. तसेच कार्यक्षमता संपल्यावर लष्कराकडून घोडे महामंडळाला लसींच्या निर्मितीसाठी दिले जातात.
लष्कराकडून आलेले घोडे ७ ते ८ महिने निरीक्षणाखाली ठेवल्यावर त्यांचा लस निर्मितीसाठी वापर करता येऊ शकेल. मागणीदारांना लसींचा वेळेत पुरवठा करण्यासाठी उत्पादन व्यवस्थेत वेळोवेळी आवश्यक त्या सुधारणाही केल्या जात आहेत.
- डॉ. शिवाजी गाडे, व्यवस्थापक, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.