‘दगडखाणीतला हिरा’ देणार योजनांना गती

उमेश घोंगडे
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

पुणे - स्वत: अल्पदृष्टी असल्याने दिव्यांगांसाठी काही चांगल्या योजना प्रत्यक्षात आणाव्यात, या भूमिकेतून आंध्र प्रदेश केडरचे ‘आयएएस’ अधिकारी बालाजी मंजुळे हे प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले आहेत. राज्यात आल्यानंतर त्यांनी अपंग कल्याण आयुक्तपदाची जबाबदारी स्वत:हून मागितली.

पुणे - स्वत: अल्पदृष्टी असल्याने दिव्यांगांसाठी काही चांगल्या योजना प्रत्यक्षात आणाव्यात, या भूमिकेतून आंध्र प्रदेश केडरचे ‘आयएएस’ अधिकारी बालाजी मंजुळे हे प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले आहेत. राज्यात आल्यानंतर त्यांनी अपंग कल्याण आयुक्तपदाची जबाबदारी स्वत:हून मागितली.

त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारनेही त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली असून, दोन दिवसांपूर्वी मंजुळे यांनी पुण्यात येऊन आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. दिव्यांगांच्या रखडलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी तसेच नव्या योजना आणण्याचे नियोजन असल्याचे मंजुळे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील जेऊर हे मंजुळे यांचे मूळ गाव. २००९ च्या आयएएसच्या तुकडीतील अधिकारी असलेल्या मंजुळे यांनी गेली नऊ वर्षे आंध्र प्रदेशमध्ये विविध पदावर काम केले आहे. मात्र स्वत: अल्पदृष्टी असल्याने दिव्यांगांचे प्रश्‍न त्यांना माहीत आहेत. यूपीएससीचा अभ्यास गावाकडे राहून तसेच पुण्यातून त्यांनी केला. त्यामुळे पुण्यात येऊन दिव्यांगांसाठी काही काम करावे, ही त्यांची भावना होती. त्यातून त्यांनी प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला. मंजुळे यांची आयएएस बॅचमध्ये देशात ५६ व्या क्रमांकाने निवड झाली होती. वडार समाजातील ते राज्यातील पहिले आयएएस अधिकारी असून, त्यांचा एक डोळा पूर्ण निकामी आहे. दुसऱ्या डोळ्यालादेखील दृष्टी कमी आहे. आई-वडील जेऊरला दगड फोडण्याचे करीत असताना मंजुळे हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होते. प्रतिकूल शारीरिक, अर्थिक व सामाजिक परिस्थितीतून मोठ्या संघर्षाने मिळवलेल्या यशाचे त्या वेळी कौतुक झाले होते. आई-वडिलांची हयात रस्त्यावर दगड फोडण्यात गेल्याने ‘दगडखाणीतला हिरा’ या शब्दांत मंजुळे यांचे ‘आयएएस’मधील यशानंतर कौतुक झाले होते.

Web Title: IAS Officer Balaji Manjule Commissioner of disabled welfare