...म्हणून बारामतीकरांनो, थोडा संयम पाळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

कोरोनाचा रुग्ण न सापडल्यास शहराचा ऑरेंज झोनमध्ये समावेश 

बारामती : येथील नगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येत्या २८ एप्रिलपर्यंत बारामतीत जर कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही, तर बारामतीचा समावेश रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये होईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात शहराच्या विविध भागातील २६ जणांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्या सर्वांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे अजून दिलासा मिळाला आहे. बारामतीत शेवटचा कोरोना रुग्ण १४ एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर पुढील १४ दिवस एकही रुग्ण सापडला नाही, तर बारामती नगरपालिका हद्द ऑरेंज झोनमध्ये येईल. त्या पुढील 14 दिवस जर एकही रुग्ण सापडला नाही, तर बारामती ग्रीन झोनमध्ये येईल.

 

मात्र, या काळात लोकांनी शिस्त पाळली, लॉकडाउनचे पालन केले, तर रुग्णसंख्या वाढणार नाही. मात्र, बारामतीत रुग्ण सापडल्यास बारामती पुन्हा रेड झोनमध्ये जाण्याचा धोका आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास बारामती शहर कोरोनामुक्त होणे अवघड नाही. शासकीय पातळीवर विविध विभागात सर्वेक्षण सुरुच आहे, असे डॉ. खोमणे यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If the corona patient is not found then baramati city is included in the Orange Zone