Pune News : ट्रीपल आयटीची प्रवेश क्षमता वाढणार; पुढील शैक्षणिक वर्षी नव्या संकुलात

संसदेच्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे (ट्रीपल आयटी) मधील प्रवेश क्षमता येत्या शैक्षणिक वर्षापासून वाढविण्यात येणार आहे.
iiit pune
iiit punesakal

पुणे - संसदेच्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे (ट्रीपल आयटी) मधील प्रवेश क्षमता येत्या शैक्षणिक वर्षापासून वाढविण्यात येणार आहे. शनिवारी (ता.२३) संस्थेचा पहिला पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात येत असून, त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे संचालक डॉ. ओमप्रकाश काकडे यांनी ही माहिती दिली.

ट्रीपल आयटीच्या आंबेगाव बुद्रूक येथील अस्थायी संकुलात आयोजित पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. मुकेश नंदनवार, प्रा. डॉ. चंद्रकांत गुळेद, प्रा. संजीव शर्मा, डॉ. सुशांत कुमार उपस्थित होते. प्रा. काकडे म्हणाले, ‘‘दरवर्षी ट्रीपल आयटीमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते. बी.टेक.आणि एम.टेक.चे अभ्यासक्रम आम्ही राबवितो.

सध्या एक हजार २६ वर असलेली विद्यार्थी संख्या दीड हजारापर्यंत वाढणार आहे. तळेगाव जवळील स्वतःच्या संकुलात गेल्यावर टप्‍याटप्‍याने विद्यार्थी संख्या अडीच हजार नेण्याचा आमचा मानस आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांबरोबरच संशोधनावरही आमचा विशेष भर आहे.’’

पुढील वर्षी नव्या संकुलात...

सार्वजनिक खासगी भागीदारीतील ही संस्था पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळात एक महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे. सध्या अस्थायी संकुलात असलेली ट्रीपल आयटी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून तळेगाव जवळील नानोली येथील स्थायी संकुलात कामकाज करेल, असा विश्वास प्रा. काकडे यांनी व्यक्त केला. नागपूर आणि पुण्यातील ट्रीपल आयटी एकाच वेळी सुरू झाली. आज नागपूरमधील संकुल कार्यरत झाले आहे.

मात्र, पुण्यात १०० एकरातील प्रकल्प रखडल्याचे दिसत आहे. याबद्दल विचारले असता प्रा. काकडे म्हणाले, ‘नानोली येथील संकुलाचे ४५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण होऊन, पुढच्या शैक्षणिक वर्षात नानोलीतील संकुलात आम्ही स्थलांतरित होऊ शकतो.’

शनिवारी पहिला पदवी प्रदान -

कोरोनामुळे मागील काही वर्षांचा पदवी प्रदान समारंभ पार पडला नाही. यंदा ट्रीपल आयटी पुणेचा पहिला पदवी प्रदान समारंभ पार पडत आहे. शनिवारी (ता.२३) ३३९ विद्यार्थ्यांना ही पदवी प्रदान केली जाईल. नऱ्हेतील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणन नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडीएशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

आकडे बोलतात....

- बी.टेक. साठी सध्याची प्रवेश क्षमता - २६९

- बी.टेक.साठी प्रस्तावित वाढ - ३४६

- एम.टेकची प्रवेश क्षमता (वाढ प्रस्तावीत नाही) - ५८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com