सांगली : बेदाणा

सांगली : बेदाणा
Published on

पान १

बेकायदा चीनच्या
बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

अन्न व औषध प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी संतप्त

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः राज्यातील बेदाणा निर्मितीचा हंगाम संपताच अफगाणिस्तान असल्याचे सांगून चीनचा बेदाणा सांगलीत बेकायदा दाखल झाला आहे. एका बाजूला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत आवाजही उठवला होता. बेकायदेशीर बेदाणा आणणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली होती. मात्र, याकडे प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष शेतकरी संतप्त झाले आहेत.
चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथील एका बेदाणा शेडवर अफगाणिस्तानचा म्हणून चीनचा बेदाणा बेकायदेशीर आला असल्याची माहिती द्राक्ष संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांना समजली. ते शेडवर पोहोचले असता त्याठिकाणी सुमारे २० टन बेदाण्यावर प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच हा बेदाणा अफगाणिस्तानच्या बॉक्समधून आल्याचे दिसून आले. ‘‘निर्यातदार अफगाणिस्तानचा असून आयातदार भारतातील आहे. मात्र, या बॉक्समधील बेदाणा प्रत्यक्षात चीनमधील असल्याचे दिसून आले. त्यामुळे चीनचा बेदाणा बेकायदेशीरपणे इथंपर्यंत पोहोचलाच कसा,’’ असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
सांगलीत सुमारे १०० ते २०० टन चीनचा बेदाणा आला असून त्याची विक्रीही झाली आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये देशभरात पाच हजार टन बेदाण्याची बेकायदा आवक केली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यातही १०८० टन बेदाणा आला होता. अर्थात गेल्या दहा महिन्यांत दोन वेळा अफगाणिस्तानचा म्हणून चीनचा बेदाणा काही व्यापाऱ्यांनी आणला होता. यावेळी द्राक्ष संघ आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी याविरोधात आंदोलनही केले होते. या आंदोलनात बेकायदेशीर बेदाणा आणणाऱ्यांवर कारवाई करा, अशीही मागणी केली होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.
दरम्यान, राज्यातील बेदाणा निर्मितीचा हंगाम नुकताच संपला आहे. यंदा उत्पादन दोन लाख टनांपर्यंत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच दरही यंदा चांगले आहेत. असे असतानाही पुन्हा एकदा बेकायदा चीनच्या बेदाण्याची घुसखोरी झाली असून, त्याचा परिणाम थेट दरावर होणार आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाला तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी याबाबतची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, याबाबत कोणत्याही प्रकारची तपासणी झाली नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘‘बेकायदेशीर येणारा बेदाणा पूर्ण थांबवावा, ज्या-ज्या व्यापाऱ्यांनी हा बेदाणा आणला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने आमच्या मागणीकडे लक्ष दिले नाही, तर पुन्हा आंदोलन करू,’’ असा इशारा द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

कोट
बेकायदेशीर बेदाणा येतोच कसा, असा विधानसभेत आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर बेकायदेशीर चीनचा बेदाणा सापडलेलाच नाही, असे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. त्यामुळे तपासणी बाजूला राहिली. जर वेळीच कारवाई केली असती तर अशा पद्धतीने बेदाणा भारतात आलाच नसता.
- मारुती चव्हाण,
उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com