

वाघोली, ता. २५ : वाघोली-लोहगाव रस्त्यावरील शिवरकर वस्ती परिसरात पोलिसांनी छापा टाकून प्रतिबंधित गुटखा आणि विदेशी सिगारेट जप्त केल्या. याप्रकरणी स्कॉर्पिओ मोटारीसह १७ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रिफाकत जामीन अली व सलमान मलिक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिस हवालदार प्रदीप मोटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरकर वस्ती येथे स्कॉर्पिओ मोटार संशयास्पदरीत्या उभी होती. पोलिसांचे पथक जवळ येताच चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. वाहनाची झडती घेतली असता त्यात गुटखा, पानमसाला, जर्दा आणि विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला.