

शिरूर, ता. २२ : शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यालगत जुन्या मार्केट यार्डच्या समोर गोपाळवस्ती परिसरात खुलेआम सुरू असलेल्या हातभट्ट्या पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केल्या. बुधवारी (ता. २१) रात्री केलेल्या या कारवाईतून, गावठी हातभट्टी दारूसह ही दारू तयार करण्यासाठीचे कच्चे रसायन असा सुमारे सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बेकायदेशीरपणे गावठी दारू गाळल्याप्रकरणी व अवैध विक्रीप्रकरणी सहा महिलांसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन महिलांसह चौघांना अटक करण्यात आली.
नंदा जनार्दन पवार (वय ५०), मीना युवराज गव्हाणे (३५), राहुल विश्वनाथ पवार (३५) व सुभाष विश्वनाथ पवार (४४) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यासह कविता किरण पवार, कमल जयसिंग गव्हाणे, सतीश जयसिंग गव्हाणे, सरस्वती पवार, सविता राजकुमार गिरे, संजय छबुराव जाधव, रमेश छबुराव जाधव, राजेंद्र छबुराव जाधव व उमेश संजय जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोपाळवस्ती परिसरात बेकायदा हातभट्टी दारूचे धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, शिरूरचे निरीक्षक विनोद पाटील, विशेष गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक शिवाजीराव भोसले, उपनिरीक्षक हणमंत नकाते यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस पथकाने छापा टाकला. या वेळी परिसरात विविध ठिकाणी हातभट्ट्या सुरू असल्याचे निदर्शनास आले.
बाबूराव नगरमध्येही एका घरात छापा
शहरालगत बाबूराव नगर येथे एका घरात हातभट्टीची दारू विक्रीसाठी ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तेथे छापा टाकून पाच लिटर हातभट्टी दारू जप्त केली. अवैधरित्या हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी तुषार शहाजी थिटे (वय २८) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आपल्या परिसरात किंवा माहितीत कुठे अवैधरित्या गावठी दारूधंदे सुरू असतील तर पोलिस यंत्रणेला कळवावे. नाव उघड न करता संबंधित ठिकाणी छापे टाकून अवैध दारूधंदे उद्ध्वस्त केले जातील. दारूधंद्यावरील कारवाईत एकापेक्षा अधिक वेळा नाव समाविष्ट झालेल्या संशयितांविरुद्ध हद्दपारीसारखे कठोर पाऊल देखील उचलले जाईल.
- शिवाजीराव भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक, विशेष गुन्हे शोध पथक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.