

नियमबाह्य वसुली करणाऱ्या
वित्तीय संस्थांवर फौजदारी
जिल्हाधिकारी कर्डिले : कर्जवसुलीसाठी सक्ती खपवून घेतली जाणार नाही
ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत कर्जवसुली करताना स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व इतर वित्तीय संस्थांकडून कर्जवसुलीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास पोलिस व जिल्हा प्रशासनामार्फत संबंधितांवर कायद्यानुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व कर्जदार आर्थिक अडचणींचा सामना करीत असताना वित्तीय संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी सौजन्यपूर्ण व संवेदनशील वर्तन करावे. कर्जवसुलीसाठी मानसिक त्रास देणे, अपमानास्पद वर्तन करणे, धमकावणे, हिंसाचार करणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा वापर करणे तसेच सीबील स्कोर खराब करण्याची भीती दाखवून दबाव आणणे, अशा बेकायदेशीर किंवा नियमबाह्य कृती कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
क्षेत्रीय स्तरावर तहसीलदार, सहायक निबंधक, संबंधित दुय्यम निबंधक सहकार अधिकारी यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व इतर वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे. अनधिकृत वसुली, कर्जदारांना धमकावणे आणि इतर संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्यांची तातडीने पडताळणी करून संबंधित कायद्यांनुसार आवश्यक कारवाई करावी. अशा प्रकरणांचा नियमित आढावा घेऊन केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले. सर्व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली करताना लागू नियमांचे पालन करणे, कर्जदारांच्या सन्मानाचे व कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणे आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाच्या तंत्रांचा वापर टाळणे बंधनकारक आहे. दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकरी व सर्वसामान्य कर्जदारांना त्रास देणाऱ्या संस्थांविरुद्ध प्रशासन कठोर भूमिका घेणार असून, नियमभंग करणार्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी या बैठकीत दिला. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.