

राहू, ता. ६ : दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील राहू बेट परिसरामध्ये अवैध सावकारकीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, अनेक शेतकरी आर्थिक गुलामगिरीत अडकले आहेत. व्याजापोटी शेतकऱ्यांच्या जमिनी आणि वाहने सावकारांनी ताब्यात घेतल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात तक्रारींचे प्रमाण कमी असून, कारवाई होत नसल्याने सावकारांचे धाडस वाढले आहे.
राहू आणि आसपासच्या परिसरातील २० हून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांनी व्याजाच्या बदल्यात स्वतःच्या किंवा नातेवाइकांच्या नावावर करून घेतल्या आहेत. गरजेच्या वेळी व्याजाने पैसे दिल्यानंतर, वेळेवर परतफेड न झाल्यास जमिनींचे खरेदीखत करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्याही सावकारांनी ओढून नेल्या असून, त्या नियमबाह्यरीत्या वापरल्या जात आहेत. या क्षेत्रात पांढरपेशी व्यक्तींचा समावेश अधिक असून, राजकीय वरदहस्तामुळे ते पोलिसांना जुमानत नसल्याचे चित्र आहे.
गावातील वाद मिटवण्यासाठी स्थानिक पुढारी मध्यस्थी करतात; मात्र अनेकदा राजकीय गटतटांमुळे कोणीही उघडपणे सावकारांविरुद्ध बोलायला तयार होत नाही. काही ठिकाणी मध्यस्थी करणारेच या व्यवहारातून आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. तक्रार केल्यास होणारा छळ आणि गुंडगिरीच्या भीतीमुळे पीडित शेतकरी समोर येण्यास धजावत नाहीत. दौंड तालुक्यात अधिकृत परवानाधारक सावकारांची संख्या मोजकीच असताना, अनधिकृत सावकारांनी दहशतीच्या जोरावर मोठा व्यवसाय थाटला आहे.
प्रशासनाने या अवैध सावकारी रॅकेटवर तातडीने अंकुश न ठेवल्यास सामाजिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, अवैध सावकारी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.