डोर्लेवाडी परिसरात बेसुमार अवैध वाळू उपसा; प्रशासनाचे दुर्लक्ष

सोमनाथ भिले
Tuesday, 12 January 2021

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे मागील आठ दिवसापासून कऱ्हा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा होत असताना महसूल व पोलिस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे मागील आठ दिवसापासून कऱ्हा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा होत असताना महसूल व पोलिस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या वर्षी कऱ्हा नदीला मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी  आल्यामुळे नदीपात्रात वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे.मागील अनेक वर्षापासून या परिसरातील कऱ्हा नदी पात्रातील वाळूचा लिलाव न झाल्याने वाळूची किरकोळ चोरी होत होती, मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नदीपात्रात चार ते पाच फुटांचा वाळूचा थर निर्माण झालेला आहे.त्यामुळे  अधूनमधून उपसा सुरूच होता. मात्र मागील आठ दिवसांपासून वाळूमाफियांनी रात्रीच्या वेळी खुले आम मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू केलेला आहे.

सदर वाळू उपशामुळे परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे तसेच नदीच्या पलीकडे असणाऱ्या काळोखे गंधारे वस्ती या ठिकाणी जाणारी पाईपलाईन नदीपात्रामध्ये या वाळूच्या अवजड वाहनांमुळे तुटलेली आहे. त्यामुळे सदर वस्तीवरील नागरीकांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाळू व्यवसायिक आपली वाहने ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये येऊ नये यासाठी गावातील अंतर्गत रस्त्याचा वापर करून गावाबाहेर वाळूची वाहतूक करीत आहेत त्यामुळे गावठाण अंतर्गत नुकत्याच झालेल्या नवीन रस्त्यांचीदेखील  यामुळे खराबी होत आहे. गावात बेकायदेशीर वाळू उपसा होत असलेबाबत गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांमध्ये चर्चा होत आहे, मात्र महसूल, पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासन या बेकायदेशीर वाळू उपशाकडे का दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.

"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

खाजगी क्षेत्रातील वाळू मालकी कोणाची... कऱ्हा नदी पात्रालगत अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून शेती तयार केली आहे. त्याठिकाणी ते आपला मालकी हक्क समजून वाळू उपसा करीत आहेत. तसेच गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडी येथील नदी पात्रालगत असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी आपल्या खासगी क्षेत्रातील वाळू मोठ्या प्रमाणात काढून विक्री सुरू केली आहे,याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याने  ही जमिनीखाली निघणारी वाळू नक्की कोणाच्या मालकीची याबाबतही नागरिकांच्या मनात संभ्रम आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal sand extraction in dorlewadi area