जवळा येथे महसुल भरारी पथकावर भ्याड हल्ला; मंडळ अधिकारी महेश जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण; वाहनांची तोडफोड
SGW26B09414, SGW26B09415
सांगोला : येथील तहसीलदारांच्या गाडीवर अवैध वाळू मुजोरांनी दगडफेक करून गाडीची काच फोडली.
सांगोला : महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संबंधितांना कडक कारवाई करण्यासंबंधीचे निवेदन तहसीलदार बाळूताई भागवत यांना देताना महसूल अधिकारी व कर्मचारी.
अवैध वाळू कारवाईस गेलेल्या महसूल पथकावर हल्ला
वाहनांची तोडफोड; अधिकाऱ्यांस मारहाण, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ४ : जवळा (ता. सांगोला) येथील कोरडा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकावर मंगळवारी (ता. ३) पहाटे गाडी अंगावर घालत हल्ला केला आहे. अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीत महसूल सेवक जखमी झाला आहे. याप्रकरणी मंडल अधिकारी महेश गणपत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतुल गावडे, पप्पू बिचुकले (दोघे रा.जवळा, ता.सांगोला) तसेच अज्ञात टिपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगोल्याचे तहसीलदार यांच्या आदेशानुसार अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत भरारी पथक कार्यरत आहे. ३ मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जवळा येथील आगलावे वस्ती परिसरात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंडळ अधिकारी जाधव यांच्यासह गौरव कुंभार (ग्राममहसूल अधिकारी), समाधान सूर्यगंध, सुनील गोडसे, दिलीप काळे व इतर कर्मचारी शासकीय वाहन (एमएच ४५ एएल ८१७१) व खाजगी वाहन (एमएच ४५ एयू ६७३१) घेऊन रवाना झाले.
पहाटे सुमारे ३.०५ वाजता कडलास-जवळा मार्गावर विनानंबर पांढऱ्या रंगाचा सहा टायरचा टिपर संशयास्पद अवस्थेत आढळला. पथकाने वाहन थांबविल्यानंतर चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. तपासणीअंती अंदाजे तीन ब्रास वाळू (किंमत १४ हजार २५० रुपये) विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. सुमारे पाच लाख रुपये किमतीचा टिपर जप्त करून तहसील कार्यालयाकडे आणत असताना पहाटे ३.४० वाजता कडलास येथे विनानंबर पांढरी चारचाकी आडवी लावून पथकाची अडवणूक करण्यात आली.
यावेळी अतुल गावडे व पप्पू बिचुकले यांनी शिवीगाळ व दमदाटी करत वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच दगडफेक करून शासकीय व खाजगी वाहनांच्या समोरील काचा फोडून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केले. या हल्ल्यात मंडळ अधिकारी जाधव यांना मारहाण करण्यात आली, तर महसूल सेवक सुनील गोडसे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे नख दगड लागून तुटले.
महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
महसूल कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोल्यातील महसूल कर्मचारी संघटनेने संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी करत गुन्हा दाखल होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन केले. याबाबतचे निवेदन तहसीलदार व संबंधित वरिष्ठ विभाग प्रमुखांना दिले. या घटनेमुळे महसूल विभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोट
- महसूल विभागातील अवैध वाळू उपशाविरोधात भरारी पथके तयार केली आहेत. अधिकाऱ्यांवर केलेला हल्ला निषेधार्थ असून यासंबंधी कडक भूमिका घेणार आहोत. यापुढे अवैद्य वाळू उपशावर नियमित नियमित कारवाई केली जाईल
- बाळूताई भागवत, तहसीलदार, सांगोला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

