मार्केट यार्ड : स्वच्छतागृहाच्या ठिकाणीच थाटले बेकायदेशीररित्या गाळे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

- वीस वर्षानंतर प्रकार उघडकीस

मार्केट यार्ड (पुणे) : बाजार आवारातील विविध विभागात व्यापारी, शेतकऱ्यासंह कामगारांसाठी नऊ स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या गाळे बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी रविवारी बाजारातील विविध विभागांची पाहणी केली. या केलेल्या पाहणीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. त्या नऊ गाळ्यांपैकी दोन ठिकाणी हॉटेल तर अन्य ठिकाणी व्यापार सुरु आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी प्रशासक गरड यांनी रविवारी कांदा बटाटा, फूल तसेच केळी बाजार विभागाची पाहणी केली. त्या ठिकाणी असलेल्या सोयी सुविधांसह होणाऱ्या व्यापाराची माहिती घेतली. त्याबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ‘मार्केट यार्डातील बाजारातील फळे, कांदा बटाटा, तरकारी, केळी बाजार अशा विभागामध्ये व्यापारी, कामगार, शेतकऱ्यांसाठी 20 वर्षापूर्वी स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती. यामध्ये विविध विभागाच्या नऊ पाकळ्यांमध्ये नऊ स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती. मात्र, त्या स्वच्छतागृहांचे बेकायदापद्धतीने गाळ्यांत रुपांतर करून बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्या नऊ गाळ्यांपैकी दोन ठिकाणी हॉटेल आणि अन्य ठिकाणी व्यापार सुरू आहे. त्या स्वच्छतागृहाच्या जागेचा गाळ्यांत रुपांतर करून गाळ्याचा 20 वर्षांपासून वापर सुरू असल्याचे उघडकीस आले. तसेच तत्कालीन मुलाणी समितीने त्यावर आक्षेप घेतला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, शेतकऱ्यांप्रमाणे महिला शेतकऱ्यांसाठी निवास उभारण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षात त्याचा वापर झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यभरातून पुण्यात मार्केट यार्डात येणाऱ्या व्यापाऱ्यांना गेस्ट हाऊस म्हणून त्याचा वापर करता येईल का तसेच त्यांच्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्या करिता नाममात्र शुल्क आकारले जाईल. त्याबाबत उपाययोजना करण्याचा विचार सुरु आहे, असे प्रशासक गरड यांनी सांगितले. भुसार विभागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्या ठिकाणी कायमस्वरुपी सांडपाण्याच्या पाईपलाईनची व्यवस्था करून सिमेंटचे रस्ते करण्याचा विचार आहे. केळी बाजारातील अनेक गाळे व्यवसायाविना बंद असून ते का बंद आहेत याची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.

स्वच्छतागृहाच्या जागेचे गाळ्यात रुपांतर कसे झाले, त्या विक्रेत्यांना गाळे प्रदान करण्यात आले किंवा कसे आणि त्या पुढे संबंधितांकडून शुल्क आकारणी करता येईल का तसेच कोणत्या पद्धतीने वसूल करावी याबाबत पणन संचालकांशी सल्लामसलत करणार आहोत.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

कारवाई होणार का?

मागील 20 वर्षांपासून या बेकायदेशीर गाळ्यांचा वापर सुरू आहे. मात्र आता या स्वच्छतागृहाच्या ठिकाणी बेकायदेशीर गाळे बांधकाम करणाऱ्यांवर व या प्रकारास पाठीशी घालणाऱ्या संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal slums at toilet site in market yard pune