Vidhan Sabha 2019 : आचारसंहिता भंग केल्यास तत्‍काळ गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून, सर्व विभागप्रमुखांनी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

विधानसभा 2019
पुणे - निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून, सर्व विभागप्रमुखांनी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सर्व विभागप्रमुख, नोडल अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, रेल्वे आणि बॅंकांच्या प्रतिनिधींसमवेत बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत आदी या वेळी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘आचारसंहिता कक्षाची जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापना केली आहे. आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घेण्यासाठी आचारसंहितेचा अभ्यास करावा. आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सी-व्हिजिल’ या मोबाईल ॲपचा वापर करण्यात येईल. आयोगाच्या सूचनांचे पालन करून ही निवडणूक शांततेत पार पाडावी.’’

सर्वसामान्यांना  नको त्रास
राजकीय पक्षांनी प्रचाराच्या विविध माध्यमांचा वापर करण्यापूर्वी ते प्रमाणित करून घ्यावे. प्रचारावर होणाऱ्या सर्व खर्चाचे विवरण सादर करावे. शेड्यूल, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बॅंकांमध्ये निवडणूक काळात आयोगाने दिलेल्या आदेशानुसारच आर्थिक व्यवहार होतील. १० लाखांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहाराची माहिती महाव्यवस्थापक, प्राप्तिकर विभागाकडे नोंदवावी. मात्र, सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी अशा सूचना  राम यांनी दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immediate offense if a code of conduct is violated