प्राणी-पक्ष्यांवर तत्पर उपचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

  • पपराईजमध्ये नोंदणी झालेले स्वयंसेवक - १०८९ 
  • देशातील राज्यांमध्ये या उपक्रमाची सुरुवात - २५ 
  • शहरांचा समावेश - ३६९ 
  • पुण्यात उपलब्ध स्वयंसेवक - ५४ 

पुणे - पाळीव किंवा भटके पक्षी व प्राण्यांबाबत कोणती दुर्घटना घडल्यास त्यांच्यावर त्वरित व उपचार करणे आता शक्‍य होणार आहे. त्यांच्या मदतीसाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून व्यासपीठ उभारले आहे. पशू व पक्षांच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांनी त्यावर नोंदणी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पपराईझ डॉट कॉम  (Puprise.com)  असे या संकेतस्थळाचे नाव आहे. यामाध्यमातून देशभरात स्वयंसेवकांची निर्देशिका बनविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

‘पपराईज’च्या संस्थापक मयूरी मेहता-जैन यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. घरात कुत्रे, मांजर, पोपट असे विविध प्रकारचे पशू-पक्षी पाळले जातात. तसेच भटक्‍या प्राण्यांचीही संख्या मोठी आहे. या पशू, पक्षांबाबत एखादी दुर्घटना घडल्यास त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे ‘पीपल फॉर ॲनिमल’च्या (पीएफए) सहकार्याने जगभरात पशू स्वयंसेवकांचे नेटव्हर्क स्थापित करण्यात येत आहे. ‘पीएफए’ या पशू कल्याण संस्थेच्या अंतर्गत २५ रुग्णालये, १६५ युनिट तसेच अडीच लाख सदस्यांचा समावेश आहे.

तत्काळ मिळेल मदत
‘पपराईझ’च्या माध्यमातून देशातील सर्व स्वयंसेवक एकत्रित येतील. पक्षी व प्राण्यांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी ते काम करतील. तसेच मदतीच्या वेळी ही निर्देशिका नागरिकांना सोप्या पद्धतीत वापरता येईल. हा आमचा उद्देश्‍य आहे. मदतीची आवश्‍यकता असलेल्यास त्या भागातील स्वयंसेवकास फोन करावा. तो मदतीसाठी तत्पर असेल. प्रत्येक भागानुसार स्वयंसेवकांची माहिती संकेतस्थळावर देण्यात येणार आहे, असे मयूरी मेहता-जैन यांनी सांगितले.

स्वयंसेवक निर्देशिका म्हणजे काय?
या निर्देशिकामध्ये प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ‘स्वयंसेवका’चे संपर्क क्रमांक आणि त्यांच्या ई-मेल आयडीची यादी करण्यात आली आहे. यात विविध शहरातील स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे गरजेनुसार त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या स्वयंसेवकाशी संपर्क साधणे सोपे होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: immediate treatment on animal and bird