नागरिकांच्या "साद'ला आठ मिनिटांत "प्रतिसाद' 

पांडुरंग सरोदे 
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

नागरिकांना आता आठ मिनिटांपेक्षाही कमी वेळेत प्रतिसाद देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी ही वेळ किमान 20 मिनिटांपर्यंत जात होती. 

पुणे - शहरात घडणाऱ्या कोणत्याही घटनेची नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळताच त्या-त्या पोलिस ठाण्यांचे गस्तीवरील बीट मार्शल आता अवघ्या आठ मिनिटांमध्ये प्रतिसाद (रिस्पॉन्स टाइम) देऊन नागरिकांना मदतीचा हात देत आहे. विशेषतः नागरिकांना आता आठ मिनिटांपेक्षाही कमी वेळेत प्रतिसाद देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी ही वेळ किमान 20 मिनिटांपर्यंत जात होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पर्वती येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेतल्याची माहिती दत्तवाडी बीट मार्शलला पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानंतर अवघ्या 4 ते 8 मिनिटांत त्या परिसरात गस्तीवर असणारे सहा बीट मार्शल घटनास्थळी पोचले. त्यांनी ज्येष्ठाला तत्काळ रुग्णालयात पोचवून त्यांचे प्राण वाचविले. कुठे घरगुती भांडणे, तर कुठे गुंडांकडून दहशत निर्माण करणे, चोरी, घरफोडीपासून ते रस्त्यावरील अपघात, छेडछाड अशा कोणत्याही प्रकारच्या घटनेनंतर नागरिकांकडून पहिल्यांदा पोलिसांना माहिती दिली जाते. त्यानंतर पोलिसांच्या मदतीकडे ते डोळे लावून बसत होते. त्या वेळी पोलिसांकडून प्रतिसाद (रिस्पॉन्स टाइम) मिळण्यास बऱ्याचदा वेळ लागत असे. अनेकदा घटना घडून गेल्यानंतर काही तासांनी पोलिस तेथे पोचत असे. त्यामुळे पोलिस टीकेचे धनी ठरत होते. 

दरम्यान, पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर मिळणाऱ्या माहितीची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना तत्काळ प्रतिसाद देण्याची सूचना पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी दिली होती. त्यानुसार, मागील काही महिन्यांपासून नागरिकांना प्रतिसाद देण्याची वेळ तब्बल आठ मिनिटांवर आणण्यात पोलिस प्रशासनाला यश आले. 

""पोलिस नियंत्रण कक्ष किंवा पोलिस ठाण्याकडून मिळणाऱ्या माहितीनंतर चार ते आठ मिनिटांमध्ये आम्ही घटनास्थळी पोचतो. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्याबरोबरच संकटात सापडलेल्या, अपघातग्रस्त नागरिकास तत्काळ मदत मिळते. विशेषतः जलदगतीने पोचल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो, याचा आम्हाला अनुभव आहे.'' 
- विशाल ठोंबरे व सतीश भारती, बीट मार्शल, पोलिस कर्मचारी, दत्तवाडी पोलिस ठाणे 
 

""सध्या पोलिसांच्या प्रतिसादाची वेळ आठ मिनिटांपर्यंत आहे. त्याचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे. जिथे प्रतिसादाची वेळ जास्त आहे. तेथील कारणे शोधून उपाययोजना केल्या जात आहेत. विशेषतः आम्ही पोलिस ठाण्यांना बीट मार्शल वाढविण्यावरही भर देत आहोत.'' 
- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा 

विलंबावर उपाययोजना 
पत्ता न सापडणे, माहिती मिळण्यातील अडथळे, एकाचवेळी दोन घटना घडणे यामुळे अनेकदा बीट मार्शलला घटनास्थळी पोचण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाकडून त्यावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आठ मिनिटांपेक्षाही कमी वेळेत पोलिसांकडून प्रतिसाद मिळण्यास मदत होण्याची शक्‍यता आहे. 

बीट मार्शल प्रतिसाद वेळ (रिस्पॉन्स टाइम) 

शहर पोलिस ठाणे कार्यक्षेत्र प्रतिसादाची वेळ 

पुणे 30 331 8 मिनिटे 
ठाणे 36 147 7 मिनिटे 
मुंबई 96 603 7 मिनिटे 
नवी मुंबई 20 108 10 मिनिटे 
नागपूर 30 227 10 मिनिटे 

-------------------------------------------- 
- पोलिस नियंत्रण कक्षात 100 क्रमांकावर 2019 मध्ये आलेले फोन- तीन लाख 81 हजार 69 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Improvement of Police Beat Marshall's Response Time in the City