लोणावळ्यात 'बेभरवशाच्या' राजकारणाचा पुन्हा एकदा प्रत्यय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Politics
लोणावळ्यात 'बेभरवशाच्या' राजकारणाचा पुन्हा एकदा प्रत्यय

लोणावळ्यात 'बेभरवशाच्या' राजकारणाचा पुन्हा एकदा प्रत्यय

लोणावळा : लोणावळ्यात बेभरवशाच्या राजकारणाचा पुन्हा एकदा प्रत्यय दिसून आला. नगरपरिषदेची टर्म संपत असल्याने शेवटच्या दिवशी बोलावण्यात आलेली शेवटची ऑफलाइन (Offline)सर्वसाधारण सभेसह विशेष सभा प्रशासनाकडून कोरोना (Corona)नियमांचे कारण देऊन अचानक रद्द करण्यात आली. त्यात भाजप (BJP)आणि काँग्रेसचा (Congress)गेली पाच वर्षे थाटला गेलेला संसार मोडण्याची चिन्हे असून निवडणुका (Election)तोंडावर असल्याने लोणावळ्याच्या (Lonavala Politics)राजकारणाचा फड आता रंगू लागला आहे. गेल्या आठवड्यात चार जानेवारीला नगरपरिषदेच्या वतीने बोलाविण्यात आलेली विशेष सभा भाजपाबरोबर सत्ताधारी गटात असलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने गणपूर्तीअभावी तहकूब झाली होती.

हेही वाचा: महानगरपालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडीकरिता प्रयत्न ; छगन भुजबळ

खंडाळ्यातील जागेचे भूसंपादन व एका जागेवरील नेचर रिझर्व्ह चे रहिवास झोन मध्ये बदल करणे या विषयपत्रिकेतील विषयांमुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या सदस्यांमूळे सभा तहकूब झाली असे बोलले जात होते. सोमवारी (ता.१०) लोणावळा नगरपरिषदेची मुदत संपत असल्याने नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सदस्यांना निरोप देण्यासाठी सर्वसाधारण सभेसह विशेष सभा बोलावली होती. मात्र मुख्याधिकारी यांनी कोरोना नियमांचे कारण सांगत सदर सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी अशा सूचना केल्या. त्यात सोमवारी काँग्रेससह इतर सदस्यांनी सभेवर पुन्हा बहिष्कार टाकला. त्यामुळे एकूणच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या वातावरणातच दोन्ही सभा रद्द करण्यात आल्या. लोणावळ्यातील शह-काटशहच्या राजकारणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आल्याने लोणावळ्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: पुणे : Swimming pool बंद का?...जलतरणपटूंचा सवाल!

महाविकास आघाडीची चर्चा

लोणावळ्यातील सर्वसमावेशक राजकारणाचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही. पाच वर्षांपूर्वी भाजपच्या सुरेखा जाधव यांनी थेट जनतेतून निवडून येत कॉंग्रेसचा हात हातात घेत सत्तेचा गाडा हाकला होता. मात्र सोमवारी सर्वसाधारण सभा रद्द करत काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी आपले नगरसेवक, शिवसेना व अपक्ष तसेच भाजपामधील नाराज नगरसेवकांसह मावळचे आमदार सुनील शेळके यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप केला. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी लोणावळ्यात महाविकास आघाडीची चर्चा रंगू लागली आहे. मात्र लोणावळ्यात शेवटच्या क्षणी काहीही घडू शकते याचा प्रत्यय असल्याने पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा: चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीस अटक

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्याकडून प्रशासनाचा निषेध

सभा रद्द झाल्याने नाराज झालेल्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सदस्यांना वेळीच कल्पना न देता सभा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला. जर मुख्याधिकाऱ्यांना याची अगोदर कल्पना होती तर त्यांनी सदस्यांना विश्वासात घेणे गरजेचे असे श्रीमती जाधव म्हणाल्या. विषयपत्रिकेवरील सर्वच विषय नगरसेवकांच्या फायद्याचे नव्हते असे स्पष्ट स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरास ओडिएफ++ चा पंचतारांकित दर्जा प्राप्त करणे, शहरास कचरा मुक्त शहर घोषित करणे यांसह धोरणात्मक विकासाचे विषय मंजूरीसाठी होते असे नगराध्यक्षा जाधव म्हणाल्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top