esakal | पुण्यात दिवसभरात ३४९ कोरोना रुग्ण; बाधितांचा दर ५.५ टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Virus

कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरातील हॉटस्पॉट असलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा परिसर दुसऱ्या लाटेत मात्र, एकदम सुरक्षीत भाग राहिला आहे. शुक्रवारी फक्त एक कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे.

पुण्यात दिवसभरात ३४९ कोरोना रुग्ण; बाधितांचा दर ५.५ टक्के

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठीचे कडक निर्बंध शिथिल केल्यानंतर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.४) पहिल्यांदाच पुणे शहरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या चारशेच्या आत आली आहे. निर्बंध शिथिल करण्याच्या आदल्या दिवशी हीच संख्या दोनशेच्या आत गेली होती. परंतु कडक नियमांत सूट दिल्यानंतरचे सलग दोन दिवस नवीन रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या पुन्हा वाढते की काय, अशी भीती पुणेकरांमध्ये निर्माण झाली होती. ही भीती आजच्या रुग्णसंख्येने दूर केली आहे. शहरात शुक्रवारी ३४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्याही दुप्पट आहे. ()

दिवसात ६९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय रोजच्या मृत्यूची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली असून रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील नवे कोरोना रुग्ण, कोरोनामुक्त आणि मृत्यूची संख्या एका अहवालाद्वारे प्रसिद्ध केली जाते. मागील पाच दिवसांतील अहवालावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

पुणे शहरातील कोरेनाबाबतचे निर्बंध १ जूनपासून शिथिल केले आहेत. तत्पूर्वी म्हणजेच ३१ मे रोजी शहरात केवळ १८० नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र नियम शिथिल होताच, १ जूनला ३८४ नवे रुग्ण सापडले होते. त्यानंतर सतत दोन दिवस दिवसात साडेचारशेहून अधिक नवे रुग्ण सापडले होते. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा नवीन कोरोना रुग्ण दिवसेंदिवस कमी होत असून, कोरोनामुक्त रुग्ण वाढत आहेत. शिवाय दिवसातील मृत्यूचे माणही सातत्याने कमी होत आहे. या सर्व बाबी पुणेकरांसाठी दिलासा देणाऱ्या आहेत. आज शहरातील २१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: पुण्यात तयार होणार Sputnik-V; सीरमला DCGIची परवानगी

दरम्यान, पुणे जिल्ह्यात शुक्रवारी १ हजार ४६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत शहरातील रुग्णांव्यतिरिक्त पिंपरी चिंचवडमधील २६५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६४३, नगरपालिका क्षेत्रातील २०४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील केवळ सात रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज ४ हजार ९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्या पाच दिवसांतील तारीखनिहाय नवे रुग्ण

- ३१ मे - १८०

- १ जून - ३८४

- २ जून - ४६७

- ३ जून - ४५०

- ४ जून - ३४९

हेही वाचा: पुण्यात संततधार; मॉन्सून रविवारी राज्यात दाखल होण्याची शक्यता

भवानी पेठेत सापडला फक्त एक रुग्ण

कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरातील हॉटस्पॉट असलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा परिसर दुसऱ्या लाटेत मात्र, एकदम सुरक्षीत भाग राहिला आहे. शुक्रवारी फक्त एक कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. सर्वाधिक ६० रुग्ण हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सापडले आहेत. सरासरी बाधितांचा दर ५.५ टक्के इतका खाली आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात कोरोना बाधितांचे प्रमाण १९.७७ टक्के इतके होते. आता जूनच्या पहिल्या आठवड्यात हेच प्रमाण ५.५ टक्के इतके कमी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या ५०० पेक्षा कमी झाली आहे.

हेही वाचा: भारतीयांची कमाल; आकाशगंगेतील हायड्रोजनचं मोजलं वस्तुमान

शुक्रवारी शहरात ३४९ रुग्ण आढळले, त्याचा क्षेत्रीय कार्यालय निहाय बाधित रुग्णांचा आढावा घेतल्यास त्यामध्ये सर्वात कमी रुग्ण भवानी पेक्षा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत एक तर कसबा कार्यालयाच्यामध्ये केवळ ७ रुग्ण आढळले आहेत. शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय १३, ढोले पाटील रस्ता २०, येरवडा १६, नगर रोड २७, वानवडी-रामटेकडी १४, बिबवेवाडी १५, धनकवडी ४०, सिंहगड रस्ता ३६, वारजे-कर्वेनगर २७, कोथरूड ३५, औंध २४, कोंढवा येवलेवाडी १४ आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सर्वाधिक ६० रुग्ण आढळून आले आहेत.

(Edited by : Ashish N. Kadam)

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.