शिक्षणाचा पाया भक्कम असायला हवा - राष्ट्रपती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - देशाला पुरोगामी विचारांची परंपरा पुणे शहराने दिली आहे. शहराचा शैक्षणिक वारसा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षणातून विद्यार्थ्यांना देशसेवा आणि मानवतेची सेवा करण्याचे धडे मिळतात. त्यामुळे शिक्षणाचा पाया भक्कम असायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. 

पुणे - देशाला पुरोगामी विचारांची परंपरा पुणे शहराने दिली आहे. शहराचा शैक्षणिक वारसा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षणातून विद्यार्थ्यांना देशसेवा आणि मानवतेची सेवा करण्याचे धडे मिळतात. त्यामुळे शिक्षणाचा पाया भक्कम असायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. 

साधू वासवानी मिशनच्या वतीने साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्‌घाटन कोविंद यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, "साधू वासवानी मिशन'चे प्रमुख दादा जे. पी. वासवानी, रत्ना वासवानी आदी उपस्थित होते. 

कोविंद म्हणाले, ""आधुनिक भारताच्या जडण-घडणीमध्ये शिक्षणाचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांमध्ये पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच संस्कार रुजविणे गरजेचे आहे. आधुनिक भारतात शिक्षणाचा पाया महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात घातला. शिक्षणातून विद्यार्थ्यांना मानवतेचे धडे मिळतात आणि त्यातून समाज परिवर्तन होते.'' अडवानी यांचे या वेळी भाषण झाले. गुलशन गिडवानी यांनी सूत्रसंचालन केले. 

अभ्यासाचे ओझेही होणार कमी : जावडेकर  
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा बोजा कमी करण्यासाठी "एनसीईआरटी'मार्फत अभ्यासक्रम कमी करण्याचा सरकार विचार करीत आहे. याबाबत जवळपास 37 हजार नागरिकांनी आपल्या सूचना पाठविल्या आहेत. त्याची दखल घेत लवकरच अभ्यासक्रम कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असे जावडेकर यांनी सांगितले. 

दादा जे. पी. वासवानी यांचा संदेश : 
- शिक्षणाचा दर्जा ढासळला, तर देशाची प्रगतीही ढासळेल. म्हणून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा. 
- ध्येय आणि स्वप्नपूर्तीचा पाया शिक्षण आहे. 
- शांतता पाळणे आणि ध्यानधारणा करणे, यासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे 

Web Title: Inauguration of Sadhu Vaswani International School