Pune News : तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Increase in remuneration of teachers working on hourly basis education news pune

Pune News : तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ

पुणे : राज्य सरकारने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात तब्बल १६ वर्षांनंतर वाढ केली आहे. आता उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यातील शिक्षकांना १५० रुपये प्रति तास आणि माध्यमिक शिक्षकांना १२० रुपये प्रति तास असे सुधारित मानधन दिले जाणार आहे. परंतु शिक्षकांचा प्रवास खर्च आणि वाढती महागाई यांचा विचार करता ही मानधन वाढ अत्यल्प असल्याने शिक्षक आणि संघटनांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अर्हताप्राप्त व्यक्तीची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येते. अशा शिक्षकांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते.

घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे अर्हताप्राप्त असावे लागतात. अर्हता पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येत नाही, किंवा तसे करताही येत नाही. अशा माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्त्वांवर नियुक्त शिक्षकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ केल्याचा अध्यादेश शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव तुषार महाजन यांनी काढला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय १ डिसेंबर २०२२ पासून अंमलात येणार आहे.

‘राज्य सरकारने घड्याळी तासिका तत्त्वावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात उशिरा का होईना वाढ केली हे स्वागतार्ह आहे. पूर्वी प्रशिक्षित शिक्षकांना रुपये २० तर अप्रशिक्षित शिक्षकांना १८ रुपये मानधन दिले जात होते. त्यानंतर त्यात २००६मध्ये बदल करण्यात आला, त्यानंतर आता २०२२ मध्ये हे मानधन वाढविण्यात आले आहे. वाढत्या महागाईचा विचार करता सध्या घड्याळी तासिका तत्त्वावर नेमलेल्या शिक्षकांना मिळणारे मानधन हे न परवडणारे आहे.’’

- अविनाश ताकवले, अध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक सेल

‘‘राज्य सरकारने तब्बल १६ वर्षांनंतर तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ केली आहे. यापूर्वी २००६मध्ये माध्यमिक शिक्षकांना प्रति तास ४२ रुपये, तर उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रति तास ७२ रुपये इतके मानधन मान्य करण्यात आले होते. त्याप्रमाणेच आजपर्यंत हे मानधन मिळत आहे. परंतु महागाईचा विचार करता उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रति तास किमान ४०० रुपये मानधन मिळणे अपेक्षित होते.’’

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ