पुणेकरांना,थंडीसाठी आणखी वीस दिवस प्रतीक्षा; शहरातील कमाल व किमान तापमानामध्ये वाढ 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

शहरात गेल्या दोन दिवसांपासून अंशत- ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी होत असून, किमान तापमानात सरासरीपेक्षा एक ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याचे वेधशाळेचे निरीक्षण आहे.

पुणे - थंडीची प्रतीक्षा असलेल्या पुणेकरांना डिसेंबरपर्यंत थांबावे लागणार आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून अंशत- ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी होत असून, किमान तापमानात सरासरीपेक्षा एक ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याचे वेधशाळेचे निरीक्षण आहे. तर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून काही प्रमाणात थंडी पडण्यास पुन्हा सुरवात होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

हिवाळ्याची सुरवात ही दिवाळीनंतर होते. मात्र, यंदा हे चित्र काही प्रमाणात बदलले आहे. सामान्यत- ऑक्‍टोबर ते जानेवारी असा हिवाळ्याचा कालावधी असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरच्या गेल्या तीन दिवसांमध्ये कमाल तसेच किमान तापमान अधिक असल्याने शहरात उकाडा जाणवू लागला आहे. राज्यातही अशीच स्थिती असून, पुढील वीस दिवसानंतर मात्र राज्यात थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशात ईशान्य मॉन्सून सक्रिय आहे. परिणामी ईशान्य आणि उत्तरेकडून राज्यात वाहणारे वारे हे आपल्यासोबत आर्द्रताही आणत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, किमान तापमानाचा पारा वाढत आहे व थंडी कमी होत आहे. तसेच शहरात अंशत- ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. 

नोव्हेंबरमध्ये अशी असेल परिस्थिती 
- राज्यात 20 ते 26 नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ व कोकण गोव्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट. 
- 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर राज्यात कोरडे हवामान असून, कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 2 ते 5 अंश सेल्सिअसने घट. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील काही भागांमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2 ते 4 अंश सेल्सिअसने घसरू शकेल. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात येत्या 27 ते 28 नोव्हेंबर दरम्यान किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट दिसून येईल. मात्र, त्यानंतर किमान तापमानात वाढ होणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढेल. 
- डॉ. अनुपम काश्‍यपी, हवामानशास्त्रज्ञ 

गेल्या तीन दिवसांमधील किमान व कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 
तारीख - 16 नोव्हेंबर 2020 - 17 नोव्हेंबर 2020 - 18 नोव्हेंबर 2020 - 19 नोव्हेंबर 2020 
किमान तापमान - 15.7 - 18.6 - 18.5 - 20.3 
कमाल तापमान - 32 .6 - 31.5 - 32.6 - 33.3 

Sakal Video Gallery पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2019 मधील परिस्थिती 
तारीख - 16 नोव्हेंबर 2019 - 17 नोव्हेंबर 2019 - 18 नोव्हेंबर 2019 - 19 नोव्हेंबर 2019 
किमान तापमान - 17 - 18.2 - 16.2 - 15.3 
कमाल तापमान - 30.2 - 30.4 - 30.1 - 30.8 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in maximum and minimum temperature in the city