पुणे जिल्ह्यातील कोरोनाचे तालुकानिहाय अपडेट 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 August 2020

पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

आंबेगावात आणखी अकरा पॉझिटिव्ह 
मंचर :
आंबेगाव तालुक्‍यात मंगळवारी अकरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तालुक्‍यातील एकूण रुग्णांची संख्या 442 झाली आहे. एकाचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ झाली आहे. सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण मंचर येथे पाच आढळून आले. खडकी, कुरवंडी, भराडी, चास, पारगाव तर्फे खेड, अवसरी खुर्द येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालय, भीमाशंकर हॉस्पिटल व अवसरी खुर्द येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात उभारलेल्या कोड उपचार केंद्रात रुग्णांना दाखल केले आहे. आतापर्यंत उपचार होऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 313 आहे.  

मुळशीने ओलांडला आठशेचा आकडा 
पिरंगुट :
मुळशी तालुक्‍यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने मंगळवारी आठशेचा आकडा ओलांडला. नवीन 18 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या आता 801 झाली आहे. माण येथे 3, जांबे 3, मारुंजी 1, घोटावडे 2, नेरे 1, कासारसाई 1, म्हाळुंगे 2, सूस 1, अंबडवेट 1, कासार आंबोली 2 तर भरे येथे 1 रुग्ण सापडला आहे. बरे होऊन घरी सोडलेल्यांमध्ये 15 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्‍यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या आता 631 झाली आहे. पिरंगुट येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजअखेर मृतांची संख्या आता 24 झाली आहे. 

जुन्नरला कोरोनाचे 12 नवीन रुग्ण 
जुन्नर :
जुन्नरला मंगळवारी वडज-7, नारायणगाव-2, धनगरवाडी, ओतूर, अणे प्रत्येकी एक असे एकूण बारा नवीन रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्ण संख्या 535 झाली असून 413 बरे झाले आहेत. 98 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे.  

वेल्ह्यात दोन नवे रुग्ण 
वेल्हे :
वेल्हे तालुक्‍यात मंगळवारी दोन नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता 155 वर पोचली आहे. यामध्ये करंजावणे व सोंडे कार्ला गावामध्ये प्रत्येकी एक बाधित असून आजअखेर 131 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पाच जेष्ठांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली. 

खेडमध्ये 25 नवीन बाधित 
राजगुरुनगर :
खेड तालुक्‍यात मंगळवारी 25 रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या 1860 वर पोचली आहे. कुरकुंडी येथील 72 वर्षे वयाच्या ज्येष्ठाचा कोरोनाने ससून रुग्णालयात मृत्यू झाला. एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूमुळे खेड तालुक्‍यातील मृतांची संख्या 48 झाली आहे. चाकणला एक रुग्ण सापडला. आळंदीतही 4 तर राजगुरुनगरला सात रुग्णांची भर पडली. तालुक्‍याच्या ग्रामीण भागात 13 रुग्ण सापडले. रासे येथे 3, मोई येथे 2 आणि धानोरे येथेही 2 रुग्ण आढळले. तर काळूस, शेलगाव, कुरकुंडी, वेताळे, दौंडकरवाडी आणि पिंपरी बुद्रुक याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.  

हवेलीत 56 नवे रुग्ण 
केसनंद :
हवेलीत मंगळवारी रुग्णसंख्या घटली. नव्याने 56 जण कोरोनाबाधित आढळले, 89 जणांना डिस्चार्ज दिला. आतापर्यंत 2749 जणांना डिस्चार्ज दिला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्‍क्‍यांवर पोचले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी सांगितले. देहूत 12, खडकवासला व लोणी काळभोरला प्रत्येकी 7, मांजरी बुद्रुकला 5, वाघोलीत 4, कदमवाक वस्ती, कोंढवे धावडे, नऱ्हे, हांडेवाडी व ऊरुळीकांचनमध्ये प्रत्येकी 3, नांदेडला 2, आव्हाळवाडी, कोलवडी, किरकटवाडी व बिवरी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला. 

शिरूरला दिवसात 53 कोरोनाबाधित 
शिरूर :
कोरोनाच्या कमी रुग्णसंख्येमुळे सोमवारी दिलासा मिळालेल्या शिरूरकरांना मंगळवारी धक्का बसला. शिरूर तालुक्‍यात दिवसभरात 53 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणाही हादरली आहे. यात शिक्रापुरातील सर्वाधिक बारा रुग्णांचा समावेश असून, तळेगाव ढमढेरे व शिरूर ग्रामीण परिसरात प्रत्येकी सात रुग्ण सापडले. तर्डोबाची वाडी येथे चार बाधित सापडले असून, कोरेगाव भीमा व मलठण येथे प्रत्येकी तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मांडवगण फराटा, सणसवाडी, धानोरे व कारेगाव येथील प्रत्येकी दोघांचा; तर धामारी, करंदी व पिंपरी दुमाला येथील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पॉझिटीव्हमध्ये शिरूर शहरात सैनिक सोसायटीतील एका 65 वर्षीय पुरुषाचा आणि 63 वर्षीय महिलेचा समावेश आहे. भाजीबाजारातील 24 वर्षीय युवक आणि 72 वर्षीय नागरिकाला बाधा झाली असून, मारुती आळीतील साठ वर्षीय ज्येष्ठाचा आणि हुडको वसाहतीतील 92 वर्षीय नागरिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

दौंड तालुक्‍यात 235 निगेटिव्ह 
दौंड  :
 दौंड तालुक्‍यातील 236 नागरिकांपैकी तब्बल 235 जणांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील 160 व ग्रामीण भागातील 76 नागरिकांच्या घशातील स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी फक्त खडकी येथील एका 33 वर्षीय तरुणास विषाणूची बाधा झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in the number of corona patients in Pune district