वाढत्या पर्यटनाचा गडकिल्ल्यांना धोका | forts | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fort
वाढत्या पर्यटनाचा गडकिल्ल्यांना धोका कचऱ्यात भर, अपघाताचीही शक्यता; ‘कंट्रोल टुरिझम’ची आवश्‍यकता

वाढत्या पर्यटनाचा गडकिल्ल्यांना धोका

पुणे : अनलॉकनंतर इतर क्षेत्रांप्रमाणे पर्यटनालादेखील चालना मिळत आहे. त्यामुळे सध्या गडकिल्ल्यांना भेट देण्यासाठी पर्यटकांचा कल वाढला आहे. मात्र, वाढलेल्या पर्यटनामुळे गडकिल्ल्यांच्या परिसरात कचऱ्याचे प्रमाणही वाढत असून ‘ओव्हर ॲक्सेस टुरिझम’कडे वाटचाल होत आहे. त्याचबरोबर येथील वास्तू आणि जैवविविधतेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबर पर्यटनाला योग्यरीत्या चालना देण्यासाठी ‘कंट्रोल टुरिझम’ची अंमलबजावणी करणार असल्याचे पर्यावरण प्रेमी आणि गिर्यारोहक संस्थांनी नमूद केले आहे.

याबाबत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे म्हणाले, ‘‘साहसी पर्यटन, भटकंतीकडे नक्कीच लोकांचा कल वाढत आहे. मात्र, प्रत्येक किल्ल्याची एक क्षमता असते. किल्ल्यांना भेट देण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. यामुळे किल्ल्याच्या वास्तूंना धोका पोचतो. किल्ल्याचे दगड ढासळतात, जास्त गर्दीमुळे किल्ल्याला नीट पाहता येत नाही. तसेच, अपघातदेखील होतात. त्याचबरोबर पर्यटकांच्या वर्दळीमुळे किल्ल्यांवरील शांतता भंग होते. अलीकडे असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्याकरिता यंत्रणा निर्माण करण्यासाठी सरकारकडे लवकरच प्रस्ताव मांडणार आहोत.’’

पर्यटकांनी घ्यावी ही काळजी :
- गडकिल्ल्यांना भेट देताना निर्माण होणाऱ्या कचऱ्याला किल्ल्यांवर टाकणे टाळा
- किल्ल्यांवर जास्त गर्दी असल्यास तेथील पर्यटन टाळावे
- गडकिल्ल्यांच्या परिसरातील जैवविविधता नष्ट होणार नाही याची काळजी घेणे
- गडांवरील पाण्याच्या टाक्यांना घाण करू नये

तज्ज्ञांनी सुचवलेल्या काही बाबी :
- कचरा पेटीबरोबर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठीची सुविधा किल्ल्यांवर हवी
- किल्ल्यांचे अशास्त्रीय पद्धतीचे सुशोभीकरण टाळावे
- गडावरील शिलालेख किंवा इतर ऐतिहासिक गोष्टींचे संरक्षण
- ऑनलाइन बुकिंग सुरू केल्यास मर्यादित पर्यटकांनाच येता येईल

जैवविविधतेला धोका :
सह्याद्रीचे गडकिल्ले जैवविविधतेनी परिपूर्ण आहेत. या ठिकाणी काही विशिष्ट प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती आढळून येतात, जे इतर कोठेही उपलब्ध नसतात. मात्र, वाढत्या पर्यटकांमुळे येथील निसर्गाचा ऱ्हास आणि जैवविविधतेच्या अधिवासाला धोका पोचतोय. ब्ल्यूटूथ स्पीकर्स, कॅम्पींग, वाहनांची वर्दळ अशा कारणांमुळे जैवविविधतेवर परिणाम होतो. अंबोली घाटात नुकतेच ‘अंबोली कॅटफीश’ या माशाच्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. हा मासा संपूर्ण जगात केवळ अंबोली येथील हिरण्यकेशी मंदिर येथून उगम होणाऱ्या हिरण्यकेशी नदीत आढळतो. मात्र, पर्यटकांकडून या नदीत अंघोळ, निर्माल्य, कचरा आदी गोष्टी टाकण्यात येतात. परिणामी, ही प्रजाती नामशेष होऊ शकते. त्यामुळे जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून कंट्रोल टुरिझम गरजेचे असल्याचे सह्याद्रीविषयक अभ्यासक अनिश परदेशी यांनी सांगितले.

‘‘गेल्या अनेक वर्षांपासून विविध गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करत आहे. पूर्वी मर्यादित संख्येत पर्यटक असायचे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी पाहायला मिळत होते. आता हे चित्र बदलले आहे. गडकिल्ले केवळ पार्टीसाठीचे स्पॉट बनत चालले असून, वाढलेल्या पर्यटकांच्‍या संख्येमुळे आणि त्यांच्या कृतीमुळे प्राणी, पक्ष्यांचा नैसर्गिक वावर आता कमी होत आहे.’’
- स्वप्नील खोत, ट्रेकर

व्हॉट्सॲपवर प्रतिक्रिया कळवा :
‘कंट्रोल टुरिझम’बाबत तुम्हाला काय वाटते? अशा प्रकारच्या पर्यटनासाठी तुम्ही तयार आहात का, याबाबत आपल्या प्रतिक्रिया ८४८४९७३६०२ या क्रमांकावर कळवा.

loading image
go to top