‘इंदापूर’च्या पिशव्यांना इंग्लंड, अमेरिकेची पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalpana Dhotre

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मयुरेश्वर महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या पिशव्यांना परराज्य आणि परदेशातूनही मोठी मागणी वाढली आहे.

Indapur Bags : ‘इंदापूर’च्या पिशव्यांना इंग्लंड, अमेरिकेची पसंती

पुणे - पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मयुरेश्वर महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या पिशव्यांना परराज्य आणि परदेशातूनही मोठी मागणी वाढली आहे. आतापर्यंत ऑनलाइन विक्रीच्या माध्यमातून या बचत गटाच्या सुमारे ४०० पिशव्या इंग्लंड आणि अमेरिकेत पोहोचल्या आहेत.

याशिवाय देशातील राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पंजाब, छत्तीसगड, केरळ, गोवा आणि नागालॅंड या राज्यातून पिशव्यांना मोठी मागणी आहे. गेल्या सात वर्षांत या बचत गटाच्या पावणे दोन लाख पिशव्यांची विक्री झाली. एका वर्षाला सरासरी अडीच हजार पिशव्यांची विक्री होते. यातून सहा लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे गटाच्या अध्यक्षा कल्पना धोत्रे यांनी सांगितले.

या बचत गटाने ‘कल्पना’ नावाने पिशव्यांचा स्वतंत्र ब्रॅंड तयार केला आहे. या माध्यमातून कडी पिशवी, कुंडी पिशवी, हॅंड पाऊच, पर्स, शॉपिंग व भाजीपाला पिशवी, ज्यूट, रेग्झीन, स्ट्रॉबेरी आणि मोबाईल आदी विविध प्रकारच्या पिशव्या तयार केल्या जातात. या व्यवसायासाठी त्यांना कल्पवृक्ष महिला ग्रामसंघाने ५० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

‘उमेद अभियानांतर्गत हा गट असून व्यवसायासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक सचिन बाबर, तालुका व्यवस्थापिका राणी ननवरे, समन्वयक डि. जे. राऊत, समाधान भोरकडे, कामिनी चव्हाण यांचे सहकार्य मिळत आहे,’ असे धोत्रे यांनी सांगितले.

टॅग्स :IndapuramericaEnglandbags