इंदापुरातील राजकीय सस्पेन्स कायम

विनायक चांदगुडे
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

शिवस्वराज यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत 27 ऑगस्टला झालेल्या जाहीर सभेत कोणताच निर्णय जाहीर झाला नाही. त्यामुळे ही जागा कॉंग्रेसला जाणार का राष्ट्रवादीकडे कायम राहणार ? याबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे.

शेटफळगढे (पुणे) : शिवस्वराज यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत 27 ऑगस्टला झालेल्या जाहीर सभेत कोणताच निर्णय जाहीर झाला नाही. त्यामुळे ही जागा कॉंग्रेसला जाणार का राष्ट्रवादीकडे कायम राहणार ? याबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे.
गतवर्षी एप्रिलमध्ये अंथुर्णे येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांनी "वाटेल ते झाले तरी चालेल परंतु राष्ट्रवादीची ही जागा सोडली जाणार नाही. भले आघाडी नाही झाली तरी बेहत्तर !' अशी गर्जना केली होती. तर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी "कॉंग्रेस भरणे मामांचा प्रचार करेल. तुम्ही काय लय चिंता करू नका. हा पक्षाचा राज्याचा अध्यक्ष सांगतोय' असे सांगितले होते. परंतु यानंतर जवळपास सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर तालुक्‍यात अनेक राजकीय घडोमोडी घडल्या. अशातच नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तालुक्‍यातून 70 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. यासाठी कॉंग्रेसचीही मदत झाली. त्यामुळे आघाडी धर्माचे पालन होऊन इंदापूरची जागा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी कॉंग्रेसला मिळावी, अशी भावना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर विद्यमान आमदार हा राष्ट्रवादीचा असल्याने ही जागा राष्ट्रवादीकडे कायम राहावी, असा सूर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. अशातच मागील दहा दिवसांत पाटील यांच्या पक्षांतराच्या अफवेमुळे राष्ट्रवादीत चांगलाच उत्साह संचारला होता. परंतु अधिकृतरीत्या पाटील यांनी याबाबतची शक्‍यता कधीही बोलून दाखविली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. अशातच इंदापूरच्या जागेबाबतचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे. परंतु 27 ऑगस्टच्या इंदापूर येथील मेळाव्याला प्रत्यक्षात पवार आले नाहीत. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मेळाव्यात भरणे यांच्या कामाचे कौतुक केले. पण कार्यकर्त्यांना संयम राखा. आघाडीची जागा वाटपाची बोलणी सुरू आहेत, असे सांगून निघून गेले. त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा कोणाला ? याबाबतचा सस्पेन्स दूर होण्यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणखी काही दिवस "वेट ऍण्ड वॉच'च्या भूमिकेत राहावे लागणार आहे.

राज्यातील लक्षवेधी लढत
मागील 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही इंदापूरची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. परंतु 2019च्या निवडणुकीत ज्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल, त्या उमेदवाराची व पक्षाची विजयी घौडदौड आगामी काळात तालुक्‍यात होणाऱ्या सर्व निवडणुकांत कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur Congress & NCP Alliance