शेतकऱ्यांच्या पाइपांवर कोयत्याने ‘वार’
कळस, ता. ४ : इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाइपांवर पाटबंधारे विभागाच्या पथकाकडून कोयत्याने ‘वार’ केले जात आहेत. तहानलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत होणारे कोयत्याचे वार, शेतकऱ्यांच्या वर्मी बसत आहेत.
एकीकडे पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान व दुसरीकडे पाईप फोडल्यामुळे बसणारा भुर्दंड, शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना या उक्तीप्रमाणे ठरत आहे. पाटबंधारे विभागाच्या या कोयता गँगची शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून, या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
खडकवासला कालव्यातून शेती सिंचनासाठी सध्या आवर्तन सुरु आहे. इंदापूर तालुक्यातील कालव्याच्या शेवटच्या टोकाला पाणी पोचविण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. अशात तालुक्यातील कालव्याची दुरावस्था, कमी दाबाने आलेला पाण्याचा येवा, यामुळे पाणी वेगाने पुढे सरकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. कालव्यालगतचा वीजपुरवठा खंडित करण्याबरोबर, कालव्यातून होणारा पाणी उपसा रोखण्याचा पर्याय पाटबंधारे विभागाने निवडला आहे. या अनुषंगाने कालव्यातून पाणी उपसा करणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी कालव्यालगत पाटबंधारे विभागाचे पथक गस्त घालत आहे. शिवाय पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांचे पाईप फोडणे, केबल तोडणे, फ्यज काढून नेणे असे प्रकार केले जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पाटबंधारे विभागाच्या या कारवाईबाबत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
रुई येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पांढरमिसे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी घेण्यास पाटबंधारे विरोध करत असल्याची बाब गंभीर आहे. एकीकडे तालुक्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाहता ६० टक्क्यांपर्यंत पाण्याची गळती आहे. इंदापूरला पाणी देताना दौंड, हवेली तालुक्यात होणारा पाण्याचा उपसा रोखून गळती कमी करण्याची गरज असताना, कारवाई मात्र इंदापुरात करण्याचे धोरण साफ चुकीचे आहे. सध्या पिकांना पाण्याची तीव्र गरज आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने कारवाईचे धोरण बदलण्याची गरज आहे. वितरिकांना पाणी देण्याबरोबर कालव्याच्या जिवावरील पाझर तलाव, बंधारे भरून द्यावेत. केवळ शेतकऱ्यांना पाणी दाखविण्यापुरते न आणता यापुढे पाटबंधारे विभागाने इंदापूरकरांच्या वाटणीचे व हक्काच्या वार्षिक सहा टीएमसी पाण्याचा हिशोब देण्याची गरज आहे.
दरम्यान, खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पंकज हुलसुरे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

